Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईत ७०.३५ टक्के मतदान; चुरशीच्या लढतीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Updated: डिसेंबर 2, 2025

By Vivek Sindhu

Screenshot 20251202 234517 Adobe Acrobat

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २) शहरात शांततेत आणि मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. लोकविकास महाआघाडी आणि शहर परिवर्तन जनविकास आघाडी यांच्यातील थेट लढतीमुळे मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. शहरात एकूण ७०.३५ टक्के मतदानाची नोंद झाली असून, ४६ हजारांहून अधिक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आता २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोदी वि. मुंदडा प्रतिष्ठेची लढत
नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या ३१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये लोकविकास महाआघाडीचे राजकिशोर मोदी आणि शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे नंदकिशोर मुंदडा यांच्यात ‘काटे की टक्कर’ पहायला मिळाली. नगराध्यक्ष पदासाठीही मोदी विरुद्ध मुंदडा अशी थेट आणि प्रमुख लढत रंगल्याने दोन्ही गटांनी मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी जोर लावला होता.

मतदानाची आकडेवारी
शहरातील एकूण ६५ हजार ६४१ मतदारांपैकी ४६ हजार १७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुषांचा सहभाग लक्षणीय होता. ३३ हजार ३३८ पुरुष मतदारांपैकी २४ हजार ०५०, तर ३२ हजार २९९ महिला मतदारांपैकी २२ हजार १२७ महिलांनी मतदान केले. इतर ४ मतदारांपैकी एकाने हक्क बजावला. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

प्रशासकीय सुविधा आणि पोलीस बंदोबस्त
निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने चोख नियोजन केले होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विलास तरंगे, प्रियंका टोंगे, सचिन देशपांडे यांनी समन्वयाची भूमिका पार पाडली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. पीएसआय रमेश सिरसट, पीएसआय शिंदे आणि डीबी पथकाचे बदने यांनी संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले. मोबाईलबंदी आणि जमावबंदीचे पालन करत निवडणूक शांततेत पार पडल्याचे चित्र होते.

चार जागांचे मतदान २० डिसेंबरला
काही प्रभागांमध्ये उमेदवारांच्या अर्जांबाबत आक्षेप घेण्यात आल्याने आणि त्यांना माघारीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने प्रभाग क्रमांक १ (ब), ३ (अ), ६ (अ) आणि १० (ब) या चार जागांची निवडणूक मंगळवारी होऊ शकली नाही. या चारही जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

निकाल २१ डिसेंबरला
न्यायालयाच्या आदेशानुसार, या चार प्रभागांतील मतदान पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण नगर परिषद निवडणुकीची एकत्रित मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांना अंतिम निकालासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.


Categories

Recent Posts