Breaking

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला विराट बैलगाडी मोर्चा

Updated: मे 29, 2026

By Vivek Sindhu

जायकवाडीच्या पाण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांच्या घरासमोर उपोषणाचा इशारा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

रखरखत्या उन्हात शेतकर्यांचा टाहो, जायकवाडीच्या पाण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांच्या घरासमोर उपोषणाचा इशारा



बीड – येत्या दीड महिन्यात गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प व उपकालव्याचे सर्वेक्षण करा, १६८ टीएमसी मध्ये बीड जिल्ह्यातील शेतीला हक्काचे पाणी द्या यासह इतर मागण्या पूर्ण करा, अशी मागणी विराट बैलगाडी मोर्चातून रखरखत्या उन्हात आलेल्या शेतकर्यांनी केली. मागणीची पूर्तता नाही झाल्यास पायी दिंडी काढत जलस़ंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला.
यावेळी कालीदास दादा आपेट, सुशीलाताई मोराळे, भाऊसाहेब जरांगे पाटिल, समन्वयक दिनेश गुळवे, राहुल लोंढे, अप्पासाहेब महानोर, बाबुराव जेठे, अप्पासाहेब तळेकर, मोहन गुंड, कुलदिप करपे, संतोष भारती, बालासाहेब कोळेकर, राजाभाऊ महाराज कुटे, परमेश्वर वाघमोडे, देविदास वाणी, महादेव गायकवाड, संजय जाधव, ज्ञानेश्वर शेरकर, गोरक्ष परदेशी, शामराव घुगे, भास्कर मार्कड, पपू पवळ, महादेव रडे, जालिंदर रसाळ, बप्पासाहेब रत्नपारखे, अशोक काळे, लक्ष्मण नागरगोजे, सुधाकर नागरगोजे, रामेश्वर गाडे, काशीनाथ जोगदंड, राज सवासे, राजाराम निर्मळ,लक्ष्मण काशीद,भारत पवार, साई गावडे, बळीराम राक्षे, केशव जाधव, बालासाहेब शेरकर, गजानन कोळेकर,नवनाथ पवळ, वसंत पवळ, अजय गोयकर, गणेश हाडुळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील बहुतांश शेती दुष्काळग्रस्त असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडविण्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतीला जायकवाडी धरणाचे पाणी मिळावे, गोदावरी व सिंदफणा नदी जोड प्रकल्प करून उपकालवा करावा, 168 टीएमसी पाण्यात बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी द्यावे या प्रमुख मागण्यासाठी लोकलढा आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी सकाळी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट बैलगाडी मोर्चा काढला. राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विराट बैलगाडी मोर्चास सुरुवात झाली. शेतकऱ्यांचा लोकलढा, जायकवाडीचे पाणी सोडा, पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणांनी बीड शहर दणाणून गेले. प्रचंड ऊन असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला. येत्या दीड महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहिल्यानगर येथील घरासमोर पायी दिंडी काढत उपोषण करण्याचा इशारा यावेळी लोकलढा आंदोलनाच्या समन्वयकांनी दिला. बीड जिल्ह्यातील शेतकरी पाण्याविना अतिशय संकटात असल्याने जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प गतीने करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या मोर्चात इयत्ता सहाविची विद्यार्थीनी दिआ गुळवे हिने कविता सादर करीत शेतकऱ्यांच्या वेदना मांडत शेतीला पाणी देण्याची मागणी केली. या आंदोलनात जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

पाणीप्रश्न संसदेत मांडावा-आपेट
बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करीत असून याचे कारण सातत्याने शेती तोट्यात जाते हे आहे. शेतीला जायकवाडी धरणाचे हक्काचे पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांचे जीवन विकसित होईल. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत मांडावा नसता त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा या मोर्चात कालिदास आपेट यांनी दिला.

शेतकऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण करू-गुंड
राज्य शासनाकडून मराठवाड्यातील शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडविला जात नसल्याने मराठवाड्यावर अन्याय होत आहे. मराठवाड्यातील शेती पाण्याचे प्रश्न शासनाने गतीने सोडवावे, प्रकल्पाचे काम तात्काळ चालू करावे नसता येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ध्वजारोहण करू न देता हे ध्वजारोहण शेतकऱ्यांच्या हस्ते करण्याचा इशारा या मोर्चात भाई मोहन गुंड यांनी दिला.

समन्यायी पाणीवाटप करा- सुशीलाताई मोराळे
संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा विदर्भ अटीसह सहभागी झाला तर मराठवाडा विनाअट सहभागी झाला. मराठवाड्यावर अन्याय झाल्याने सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलने केली, त्यानंतर जायकवाडी प्रकल्प, एमआयडीसी व इतर कामे झाली. मराठवाड्यात मात्र सिंचनाचा मोठा अनुशेष आहे, हा अनुशेष भरून काढा व समन्यायी पाणी वाटप करा अशी मागणी प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केली.