Breaking

काळेगावघाट येथे जयंती मिरवणूकीत डीजे वाजविल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा 

Updated: मे 18, 2026

By Vivek Sindhu

काळेगावघाट येथे जयंती मिरवणूकीत डीजे वाजविल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज  – काळेगाव घाट (ता. केज) येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मिरवणूक विना परवाना काढून डीजे वाजविल्याप्रकरणी आयोजक व डीजे चालकाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

      केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीमध्ये डीजे न वाजविण्याचा, आवाजाच्या नियमांचे पालन करण्यासह मिरवणुकीसाठी रितसर अर्ज करून परवाना घेण्याच्या सूचना पोलिस ठाणे हद्दीतील गावातील व शहरातील आयोजकांच्या बैठकीत दिल्या होत्या. दरम्यान, १७ मे रोजी रात्री ७.५८ वाजता काळेगाव घाट येथे छत्रपती संभाजी महाराज यांची विनापरवाना जयंती मिरवणुक काढून असुन सदर मिरवणुकीमध्ये डीजे वाजविला जात असल्याची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार बाबासाहेब बांगर, पोलीस अंमलदार शिवाजी कागदे, संतोष गित्ते यांचे पथक गावात पोहचले. रात्री नऊ वाजता मिरवणूक ही मस्साजोग ते बोरगाव जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाजवळ आली होती. या मिरवणुकीत मोठमोठ्या आवाजात डीजे वाजत होता. सदर डिजे शंभुराजे साउंड (एम. एच. ०८ एच. २६७२) या नावाने चारचाकी वाहनावर होता. पोलिसांना पाहून डीजे चालकाने डीजे सीस्टीम बंद केली. सदरची मिरवणुक पार पडल्यानंतर आयोजक व डीजे चालकाच्या नावाची खात्री केली. पोलीस अंमलदार शिवाजी कागदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आयोजक अभिजीत चंद्रशेन खाडे (रा. काळेगाव घाट ता. केज) व डीजे चालक – मालक कल्याण संपत भाकरे (रा. भाकरे वस्ती, पाटोदा ता. पाटोदा) या दोघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार बाबासाहेब बांगर हे पुढील तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts