Breaking
Updated: जून 5, 2026
बीड येथे पहिले कर्मचारी समाधान शिबीर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात संपन्न
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – शासकीय सेवेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणी आता तातडीने मार्गी लागणार आहेत. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी कर्मचारी समाधान शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी बीड येथे पहिले कर्मचारी समाधान शिबीर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडले.
जून महिन्यातील पहिल्या जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन शुक्रवार, दि. 5जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले. यावेळी प्र.निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सोनी, उपजिल्हाधिकारी कैलास सूर्यवंशी, तहसीलदार श्री.मेंडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
बीड जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी- कर्मचारी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या शिबिरास उपस्थित राहून आपल्या सेवाविषयक समस्या अर्जाद्वारे सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले.
अनेकदा शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन, पदोन्नती, रजा, निवृत्तीवेतन किंवा सेवापुस्तिका अद्यावत करणे यासारख्या वैयक्तिक व सेवाविषयक कामांसाठी प्रशासकीय कार्यालयात वारंवार जावे लागते. कर्मचाऱ्यांची ही ससेहोलपट थांबविण्यासाठी प्रशासनाने हे अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. कर्मचारी समाधान शिबीरामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण होऊन प्रशासकीय कामाला मोठी गती मिळणार आहे. जर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी शासकीय सुट्टी आली, तर त्यापूर्वीच्या कामकाजाच्या दिवशी हे शिबीर घेतले जाणार आहे. सर्व संबंधित विभाग प्रमुखांना या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले असून, कामात दिरंगाई किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
कर्मचारी समाधान शिबिराचे तालुका पातळीवर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आणि विभागीय पातळीवर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन आजच्या शुक्रवार पासून करण्यात येत आहे. अशीही माहितीही यावेळी देण्यात आली.