Breaking
Updated: जानेवारी 8, 2026
अंबाजोगाईत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी १५ जानेवारीला होणार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: अंबाजोगाई नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी अखेर मुहूर्त ठरला आहे. येत्या १५ जानेवारी रोजी ही निवड प्रक्रिया पार पडणार असून, १४ जानेवारीपासून या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. नगर परिषदेतील सत्तासंघर्ष आणि पक्षीय बलाबल पाहता, या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अंबाजोगाई नगर परिषदेत एकूण ३१ निर्वाचित सदस्य आहेत. यामध्ये माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘लोकविकास महाआघाडी’कडे २० नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत आहे. तर, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखालील ‘शहर परिवर्तन जनविकास आघाडी’कडे ११ नगरसेवक आहेत. संख्याबळाचा विचार करता लोकविकास महाआघाडीचे पारडे जड दिसत असले, तरी राजकीय हालचालींमुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नियम आणि पक्षीय संख्याबळानुसार, अंबाजोगाई नगर परिषदेत एकूण तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. यामध्ये २० सदस्य असलेल्या लोकविकास महाआघाडीला दोन जागा, तर ११ सदस्य असलेल्या जनविकास आघाडीला एक जागा मिळणार आहे. या जागांवर कोणाची वर्णी लागते, याकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत.
उपनगराध्यक्ष पदासाठी संख्याबळाच्या आधारावर लोकविकास महाआघाडीचा दावा अत्यंत भक्कम आहे. मात्र, नगराध्यक्षपद जनविकास आघाडीकडे असल्याने, उपनगराध्यक्ष पदावरही आपलाच ताबा मिळवण्यासाठी मुंदडा गटाकडून जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. दुसरीकडे, आपले संख्याबळ टिकवून ठेवत उपनगराध्यक्ष पद आघाडीच्या पदरात पाडून घेण्यासाठी राजकिशोर मोदी यांनीही फिल्डिंग लावली आहे. या पार्श्वभूमीवर १४ आणि १५ जानेवारी रोजी होणाऱ्या राजकीय घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.