Breaking

पुण्यात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट, परळीतील एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

Updated: जून 5, 2026

By Vivek Sindhu

पुण्यात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मृतांमध्ये आई–वडिलांसह मुलाचा समावेश

पुणे / परळी : पुणे येथील खराडी भागात गॅस गळतीमुळे झालेल्या प्रचंड स्फोटात बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नंदागौळ एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. खराडीतील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी सोसायटीमध्ये शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. सिलेंडर बदलत असताना अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि परळी तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.

विष्णू मुंजाजी गिते (वय ६०), पांडुरंग विष्णू गिते (वय ३५) आणि वृंदावनी विष्णू गिते (वय ५५, सर्व सध्या रा. खांदवेनगर, खराडी, पुणे, मूळ रा. नंदागौळ, ता. परळी, जि. बीड) अशी या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी सदस्यांची नावे आहेत. या दुर्घटनेत राजेश्री पांडुरंग गिते आणि निहारिका पांडुरंग गिते (वय ५ वर्षे) या किरकोळ जखमी झाल्या असून त्या बालंबाल बचावल्या आहेत. हे कुटुंब कामानिमित्त पुण्यामध्ये स्थायिक झाले होते.

खांदवेनगर परिसरातील एका घराच्या पहिल्या मजल्यावर स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर संपल्याने दुसरा सिलेंडर लावण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी अचानक गॅसची मोठी गळती होऊन सिलेंडरने पेट घेतला. पांडुरंग गिते यांनी प्रसंगावधान राखून पेटता सिलेंडर गॅलरीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच क्षणी घरात पसरलेल्या गॅसचा प्रचंड स्फोट झाला. या आगीत घरात असलेले विष्णू, पांडुरंग आणि वृंदावनी हे तिघेही गंभीररीत्या भाजले. त्याच वेळी सून राजेश्री या बाथरूममध्ये आणि पाच वर्षांची मुलगी निहारिका गॅलरीत असल्याने त्या दोघी या भीषण आगीतून सुखरूप बचावल्या.

घटनेची माहिती मिळताच खराडी, येरवडा आणि धानोरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. गंभीर जखमी झालेल्या तिघांना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या स्फोटामुळे घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि छताचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद चंदननगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक या दुर्घटनेचा पुढील तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts