Breaking
Updated: July 4, 2025
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक वर्षांपूर्वी बंद पडलेला कर्करोग (कॅन्सर) विभाग पूर्ववत सुरू करण्यात यावा, तसेच संपूर्ण मराठवाडा विभागातील विद्युत दुरुस्ती व नुतनीकरणासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी अशा ठाम मागण्या केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी राज्य विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात केल्या आहेत.
राज्याच्या विविध भागांतील प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी विधीमंडळ अधिवेशनात आमदारांकडून मुद्दे प्रभावीपणे मांडले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर अंबाजोगाई येथील ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळावा या उद्देशाने आ. मुंदडा यांनी कर्करोग विभागाची गरज अधोरेखित करत संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयात कोट्यवधी रुपये खर्चून स्वतंत्र कॅन्सर विभाग उभारण्यात आला होता. काही काळ हा विभाग कार्यरत होता, मात्र तज्ञ डॉक्टर व आवश्यक तंत्रज्ञांच्या अभावामुळे हा विभाग कालांतराने बंद करण्यात आला. अंबाजोगाईसह बीड आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात कॅन्सर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र स्वाराती रुग्णालयातील कर्करोग विभाग बंद असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांना उपचारासाठी संभाजीनगर किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागते. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, असे आ. मुंदडा यांनी सभागृहात स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर आ. नमिता मुंदडा यांनी रुग्णांची गैरसोय थांबवण्यासाठी आणि त्यांना स्थानिक पातळीवरच उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून अंबाजोगाईतील कॅन्सर विभाग तातडीने सुरू करावा अशी आग्रही मागणी सभागृहात केली.
तसेच, परतीच्या पावसाच्या कालावधीत मराठवाड्यात दरवर्षी अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसतो. या हवामानाच्या प्रतिकूल स्थितीमुळे अनेक ठिकाणी जुनी व जीर्ण झालेली विद्युत तारे तुटतात, विजेचे खांब कोसळतात व परिणामी मनुष्यहानीसह जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर आ. नमिता मुंदडा यांनी संपूर्ण मराठवाडा विभागातील विद्युत दुरुस्ती व नुतनीकरणासाठी तातडीने विशेष बैठक बोलावावी व यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अशी मागणी देखील अधिवेशनात केली आहे.
आ. मुंदडा यांनी केलेल्या या महत्वाच्या मागणीवर शासन सकारात्मक भूमिका घेणार का, याकडे मराठवाड्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.