Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

विरोधकांचे आरोप धादांत खोटे आणि दिशाभूल करणारे : राजकिशोर मोदी

Updated: नोव्हेंबर 27, 2025

By Vivek Sindhu

पत्रकार परिषद घेवून मोदींनी विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पत्रकार परिषदेत सर्व आरोपांना सविस्तर उत्तर; विकासकामांचा ताळेबंद मांडला

अंबाजोगाई : राजकारण सोडेन पण, लोकनेते शरदचंद्र पवार साहेबांना सोडणार नाही असे म्हणणारांनी मोठ्या साहेबांना धोका दिला ते जनतेसोबत काय निष्ठा ठेवणार..? आमच्या संदर्भात विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे हे अत्यंत चुकीचे आहेत. आमच्यावर केलेले आरोप धादांत खोटे व अंबाजोगाईकरांची दिशाभूल करणारे आहेत. असे सांगून पत्रकार परिषद घेवून राजकिशोर मोदींनी विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी घरपट्टी व पाणीपट्टी थकीत ठेवल्याचा आरोप फेटाळला. “आम्ही नियमित घरपट्टी, पाणीपट्टी भरतो. आमचे राज हॉटेल असेल किंवा लॉज ही वडिलोपार्जित बांधकामे आहेत. तब्बल ३५ वर्षांपूर्वी बांधकाम झालेले आहेत. म्हणून त्याला जुन्या बांधकामाप्रमाणे सर्वांसारखीच त्या काळातील नियमानुसार घरपट्टी आहे. शासन नियमाप्रमाणे वेळोवेळी निश्चित होईल त्याप्रमाणेच भरावी लागेल त्यास मी तयार आहे. त्यामुळे आम्ही कोणतीही घरपट्टी थकीत ठेवली नाही. उलट आम्ही नियमितपणे दोन लाख रूपयांहून अधिकची घरपट्टी भरत असतो, याच्या पावत्या उपलब्ध आहेत” असे ते म्हणाले.

पाणीपट्टी विषयी त्यांनी केलेले आरोप हे निखालस खोटे आहेत. मोदी लर्निंग स्कूलसाठी घेतलेली नळ कनेक्शन हे रितसर डिपॉझिट भरून घेतले होते. परंतु, सदरचे कनेक्शन हे पूर्वीच बंद केलेले आहे. पाणीपुरवठा घेतला जात नाही. सदर ठिकाणी बोअरवेल द्वारे पाणीपुरवठा होत आहे. ही वस्तुस्थिती आहे, विरोधक पराचा कावळा करत आहेत. मागील चार वर्षांत प्रशासकाच्या आडून विरोधकांनी कारभार चालवला, या काळात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे कारण म्हणजे विरोधकांनी निकृष्ट दर्जाची पाईपलाईन टाकली, हे जनता जाणून आहे.

संकेत मोदीविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट करताना संकेत हे सात वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून युवकांसाठी स्पर्धा व उपक्रम राबवतात, त्यांच्या मित्रांचा व त्या प्रभागातील जनतेचा आग्रह होता म्हणून तो नगरपालिका निवडणूक लढवत आहे याचा उल्लेख केला.

नगपालिका राजकारणात सहकाऱ्यांना संधी न दिल्याचा आरोपही त्यांनी नाकारला. “२० उपनगराध्यक्ष, ८५ नगरसेवक घडवले. स्वाराती अभ्यागत मंडळावर माजी नगरसेवक खालेदभाई चाऊस व कचरूलाल सारडा यांना मी संधी दिली,” असे मोदी यांनी सांगितले. अनेकांना आर्थिक क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. आम्ही माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना आमदार करण्यासाठी सातत्याने त्यांच्यासोबत होतो व आहोत. निवडणुकीत आम्ही त्यांचा प्रचार केला. म्हणून आम्ही साठे यांच्या नांवाला विरोध केला हे विरोधकांचे म्हणणे राजकीय हेतूने प्रेरित व जनतेची दिशाभूल करणारे आहे.

“आमच्या काळात प्रत्येक महिन्याला नियमित वीजबिल भरण्यात येत होते, याचे पुरावे नगर पालिकेत उपलब्ध आहेत. परंतु, सन २०२१ ते २०२५ या प्रशासकाच्या काळात प्रतिमहिना 40 लाख रुपये असे सलग तीन वर्षे वीजबिल न भरल्याने नगरपरिषदेवर सध्या मोठा आर्थिक बोजा पडला,” असे त्यांनी नमूद केले.

मुकुंदराज सभागृहातील खुर्ची खरेदी प्रकरणात कोणतीही चुकीची पद्धत वापरली नाही. भ्रष्टाचार केला नाही. जे काही आहे ते नियमाप्रमाणे केले आहे. खुर्ची खरेदी निविदा यामध्ये सदरची कामे रितसर शासकीय मंजुरी घेऊन केले आहे.‌ असे असताना ही सदर खुर्ची ही विरोधकांच्या आरोपाप्रमाणे खरेदी केलेली नाही, यात कोणताही गैरव्यवहार नसल्याचे स्पष्ट करत आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असे ते म्हणाले.

स्वच्छतेच्या कामात गैरव्यवहार केल्याचे आरोप फेटाळताना मोदी यांनी उलट मागील चार वर्षात प्रशासक कालावधीतच स्वच्छता कंत्राटात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केला. दिवंगत विलासराव साहेब, आडसकर साहेब ही आमची श्रद्धास्थाने आहेत. त्यांची जागा आमच्या मनात आहे. म्हणून त्यांना कधीही विसरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

सावरकर चौकातील जागेविषयी मोदींनी सांगितले की, “सावरकर चौकातील राज मेडिकलची जागा ही आमची वडिलोपार्जित मालकिची आहे. मेडिकलच्या पश्चिमेकडील जी जागा आहे. तेथे नगरपरिषद भाडेकरू प्रमाणेच खुल्या जागेचे भाडे आकारते. कारण, ओपन स्पेसवर बांधलेले दुकाने ही जे मुळात नगरपरिषदेचे गाळे नाहीत. तर व्यापाऱ्यांनी खुल्या जागेवर स्वतः बांधलेली दुकाने आहेत. त्या शेजारील जागा ही आमची वडिलोपार्जित जागा आहे. आम्ही नियमाप्रमाणे भाडे भरतो,” असे त्यांनी सांगितले.

घरकुल योजनांबाबत त्यांनी सांगितले की, शहरातील गोरगरिबांना घरकुल योजना मिळावी या संदर्भात आम्ही घरकुल योजनेसाठीचा प्रस्ताव म्हाडाला सादर केला होता. परंतु, विकास आराखड्यात ग्रीन झोन व आरक्षण असलेल्या जागेच्या अडचणींमुळे काही प्रकरणे प्रलंबित राहिली. तसेच, ग्रीन झोन उठविण्यासाठीचा पाठपुरावाही आम्हीच केला आहे. शहरातील उद्यानांचा विकास, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजनेचे प्रस्ताव हे सर्व त्यांच्या कार्यकाळात उभे राहिल्याचा दावा त्यांनी केला.

नागरिकांच्या घरात पुराचे पाणी जाऊ नये म्हणून सर्वे नंबर ३९८, ३५९ मध्ये संरक्षक भिंत बांधली हे चुकीचे कसे असेल? तसेच पेट्रोलपंपाची जमीन ही आमची वडिलोपार्जित आहे. नजीकच्या नागरिकांचा पुराच्या पाण्यापासून बचाव व्हावा म्हणून उपाययोजना केली. जे बांधकाम केले ते रितसर मंजुरी घेऊन प्लॉटिंग केली आहे. रितसर जमीन मोजणी करून नदीपात्र रूंदी सोडून आम्ही बांधकाम केले आहे. परंतु, माझे मुख्य जागेवरील वडिलोपार्जित प्रॉपर्टी हेच विरोधकांचे खरे दुखणे आहे. या संदर्भात त्यांनी आमदार म्हणून आम्हाला वेळोवेळी त्रास दिलेला आहे. व शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. खोट्या तक्रारी करून शासनाची दिशाभूल केली आहे.

कोरोना काळात शासन निधी कमी मिळाल्याने कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेची कामे ही नगरपालिकेच्या व निधीतून केली. स्वच्छता विभागातील कचरा संकलन विषयात काही चुकीचे केले नाही. आमच्या काळात अंबाजोगाई शहरात नियमित स्वच्छता करण्यात येत होती. सध्या विरोधकांच्या माध्यमातून प्रशासक कालावधी मध्ये नको तेवढा हस्तक्षेप करून स्वच्छता कंत्राट व कामात मोठा गैरव्यवहार झाला आहे. सध्या नियमित नालेसफाई, स्वच्छतेची कामे होत नाहीत. कचऱ्याचे ढीग जागोजागी दिसून येत आहेत. आमच्या काळात व सध्या कचरा संकलनासाठी प्रत्येक महिन्याला किती खर्च होत आहे याची तुलना आरोप करणाऱ्या विरोधकांनी स्वतः करावी म्हणजे जनतेसही कळून येईल.

मागील २५ वर्षांत शहराच्या विकासासाठी योगदान दिले आहे. मागील निवडणुकीत जाहीरनाम्यात दिलेली ८० टक्के आश्वासने आम्ही पुर्ण केलेली आहेत. परंतु, त्यानंतर कोरोनामुळे निधी कमी मिळाला. तरीही कोरोनासाठीच्या उपाययोजनाची कामे शासनाचा निधी नसताना ही नगरपरिषदेने खर्च केलेला आहे. यामध्ये शासन प्रतिनिधी म्हणून नगरपरिषदेस त्यांनी आमदार म्हणून कोणतीही मदत व सहकार्य केलेले नाही. पाणी टंचाई काळात आम्ही विविध उपाययोजना राबविल्या, सुधारीत पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव, भुयारी गटार योजना प्रस्ताव आम्हीच शासनाकडे सादर केलेला आहे.

शहरातील मुख्य दोन‌ बगीचे (उद्यान) यांचे विकासकामे आमच्याच कालावधीत झालेली आहेत. सरसरी ५० लाख रूपये पर्यंत खर्च केला. हे सर्व मुळ असताना ही विरोधक शासनाकडून त्यावर २० कोटी रूपयांमध्ये कमीत कमी दहा एकर जागेत नव्याने अद्यावत बगीचा विकसित होईल. परंतु, विरोधकांना या माध्यमातून गैरव्यवहार करायचा आहे. यावर आम्ही काही बोलू नये म्हणून विरोधक आमच्यावर बिन बुडाचे आरोप करीत आहेत. अंबाजोगाईतील जनतेचा, मतदारांचा आशीर्वाद पुन्हा आम्हाला ‘कपबशीला’ व ‘लोक विकास आघाडी’ला मिळत आहे. म्हणून विरोधकांची ही जनतेसाठी दिशाभूल सुरू आहे.

“शहरात २५ वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे जनता आजही आमच्या पाठीशी उभी आहे. कपबशी व लोक विकास आघाडीला अंबाजोगाईकरांचा आशीर्वाद लाभत आहे. त्यामुळेच विरोधक घाबरून दिशाभूल करणारे आरोप करीत आहेत,” अशी टीका मोदी यांनी केली.

या पत्रकार परिषदेला माजी आमदार पृथ्वीराज साठे, नरेंद्र काळे, बबनराव लोमटे, महेंद्र निकाळजे, ऍड. शिवाजी कांबळे, सुनिल जगताप, डॉ. राजेश इंगोले, अशोक पालके, ईश्वर शिंदे, राजेश परदेशी यांच्यासह लोक विकास महाआघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


Categories

Recent Posts