Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

साधना संस्था, अंबाजोगाईच्या वतीने दिला जाणारा गझल साधना जीवन गौरव पुरस्कार, मराठीतील सुप्रसिद्ध गझलकार प्रशांत वैद्य यांना जाहीर

Updated: जानेवारी 20, 2026

By Vivek Sindhu

साधना संस्था, अंबाजोगाईच्या वतीने दिला जाणारा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई – साधना संस्था, अंबाजोगाईच्या वतीने दिला जाणारा गझल साधना जीवन गौरव पुरस्कार, अंबाजोगाई मराठीतील सुप्रसिद्ध गझलकार प्रशांत वैद्य, टिटवाळा यांना जाहीर केला आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह व रोख आकरा हजार रुपये असे आहे. येत्या ७ व ८ फेब्रुवारी रोजी अमरावती होत असलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनात गझलेचे अभ्यासक, समीक्षक व ज्येष्ठ गझलकार डॉ. राम पंडित यांच्या हस्ते देण्यात आहे अशी माहिती साधना संस्थेच्या अध्यक्षा डॉ. शुभदा लोहिया व सचिव दगडू लोमटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

२०२५ या वर्षापासून साधना संस्था, अंबाजोगाई यांच्या वतीने मराठी गझलक्षेत्रात विशेष कार्य केलेले, गझललेखन, संगीत गायक व रचनाकार, गायक,व मराठी गझलेसाठी प्रचार व प्रसार करणाऱ्या व्यक्तीस ’गझल साधना पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार, अंबाजोगाई’ देण्यात येतो. या पुरस्कार मालिकेतील पहिला पुरस्कार संगीतकार व गायक गझलगंधर्व मा. सुधाकर कदम, पुणे (यवतमाळ) यांना अंबाजोगाई येथे पार पडलेल्या साधना संस्थेने आयोजित केलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनात प्रदान करण्यात आला.

यार्षीचा दुसरा पुरस्कार संस्थेने ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. गेली ४० वर्षे मराठी गझल, कविता व गीते त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या गझला व कविता उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, विजय गटलेवार, डॉ. नेहा राजपाल, अजित केतकर यांच्यासारख्या प्रतिभा संपन्न गायकांनी गायल्या आहेत. त्यांच्या ‘कॉलेजच्या कट्ट्यावर’ व ‘तुझ्या परी कुणीतरी’ या मराठी भावगीतांची ध्वनिफित प्रसिद्ध झाली आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवरही त्यांचे गझल कविता वाचनाचे कार्यक्रम झाले आहेत. ‘काफला’ या प्रातिनिधिक गझल संग्रहानंतर आपले अनेक गझल संग्रह प्रकाशित झाले आहेत. अनेक नियतकालिके व वृत्तपत्रात त्यांच्या कविता व गझला प्रकाशित झाल्या आहेत. ‘अहवाल’ ‘विजांचा सोयरा’ आणि ‘गुलमोहर फुलताना’ या तीन प्रकाशित गझलसंग्रहानंतर ‘कविता आणि गझल’ असा एकत्रित संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
लेखना बरोबरच त्यांनी १९८८ पासून मराठी गझलेच्या प्रचार व प्रसारासाठी कल्याण येथील साप्ताहिकांमधून गझल सदर सुरू केली होती, मराठी गझल मुशायरे सुरू केले होते व ते अजूनही सुरू आहेत. डोंबिवली येथे पार पडलेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना ’गझलकट्टा’ पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी पराकाष्ठा केली आणि या गझलकट्टाचे त्यांनी प्रमुख म्हणूनही उत्तम काम केले. तेव्हापासून दोन अपवाद वगळता हा गझलकट्टा अ. भा. मराठी साहित्य संमेलनात चालू आहे. हा गझलकट्टा अमळनेर व दिल्ली साहित्य संमेलनात साहित्य महामंडळाने रद्द केला होता. म्हणून अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन घेण्याचे ठरले. त्यातील अमळनेर व अंबाजोगाई येथे पार पडलेल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन यशस्वी होण्यात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहभाग होता. मराठी गझलेच्या अस्तित्वाच्या लढाईत त्यांचे योगदान व मेहनत महत्त्वाची ठरली आहे. विशेष म्हणजे ते अभिनय क्षेत्रात उत्तम कलावंत म्हणून नावाजले होते. गझल सादरीकरणासाठी आपले अनेक कार्यक्रम महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर केलं आहेत. अनेक गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष, सादरीकरणासाठी सहभाग असा त्यांचा परिचय मोठा आहेच. अनेक महत्वाचे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन दुसरा ‘गझल साधना जीवन गौरव पुरस्कार अंबाजोगाई’ – २०२६ त्यांना प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या विशेष बैठकीत हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला. डॉ. शुभदा लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस अमर हबीब, अविनाश मुडेगावकर, सुनील जाधव, प्रा. शैलेश जाधव, प्रा. भगवान शिंदे, प्रा. डॉ. संपदा कुलकर्णी, संतोष मोहिते, कमलाकर कांबळे, शशिकला राहुल घोडके विशेष निमंत्रित सदस्य प्रा. डॉ. शैलजा बरुरे, बालाजी सुतार व गोरख शेंद्रे उपस्थित होते. पुरस्कार निवडी समितीचे सदस्य प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी– अमळनेर, नाना लोडम– अमरावती व दगडू लोमटे– अंबाजोगाई यांनी शिफारस केली त्यास संस्थेने मान्यता दिली. निवड समितीचे सदस्य यांनी अमळनेर, अंबाजोगाई व अमरावती येथे आयोजित अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून भूमिकाही पार पाडली आहे.


Categories

Recent Posts