Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

संकटांवर मात करत ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला ‘फौजदार’

Updated: डिसेंबर 30, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 12 30 at 12.20.03 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाईच्या रामप्रभू सातपुतेची गरुडझेप

अंबाजोगाई: तालुक्यातील पोलेवाडी येथील एका ऊसतोड कामगाराच्या मुलाने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली आहे. रामप्रभू बलभीम सातपुते असे या यशस्वी तरुणाचे नाव असून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संघर्षातून उभारलेले यश

रामप्रभू यांचे कुटुंब अत्यंत साधारण असून त्यांचे वडील बलभीम सातपुते हे ऊसतोड कामगार आहेत. २०१० मध्ये रामप्रभू यांच्या मोठ्या भावाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या संकटामुळे सातपुते कुटुंब पूर्णपणे खचले होते. मात्र, अशा कठीण काळातही आई-वडिलांनी रामप्रभूच्या शिक्षणासाठी कष्ट उपसले. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पोलेवाडी आणि माध्यमिक शिक्षण पठाण मांडवा येथे पूर्ण केल्यानंतर, रामप्रभू यांनी अंबाजोगाईतून डी.एड. (D.Ed) पूर्ण केले.

शिक्षक भरती रखडली अन् दिशा बदलली

डी.एड. पूर्ण झाल्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्याने रामप्रभू यांनी वेळ वाया न घालवता एमपीएससी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन क्लास लावण्याची ऐपत नसतानाही, त्यांनी जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. २०२३ च्या परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवले. नुकतेच १२ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची अमरावती येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

गावात जल्लोष आणि सत्कार

आपल्या गावातील मुलगा ‘फौजदार’ झाल्याचे समजताच पोलेवाडी ग्रामस्थांनी रामप्रभू यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी आपल्या मुलाचे यश पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “वडिलांनी ऊसतोड करून मला शिकवले, त्यांच्या कष्टाचे आज चीज झाले,” अशा भावना रामप्रभू यांनी व्यक्त केल्या.


Categories

Recent Posts