Breaking
Updated: नोव्हेंबर 6, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelजालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, जरांगे पाटलांच्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जालना जिल्हा पोलिसांनी तातडीने कारवाई करत बीड जिल्ह्यातील दादा गरुड आणि अमोल खुणे या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पूर्वीचा सहकारीच संशयित
ताब्यात घेतलेला अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून दोघांची कसून चौकशी सुरू असून, प्राथमिक चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप अधिकृतरीत्या कोणतेही नाव जाहीर केलेले नाही.
गुप्त बैठकांत आखला कट
पोलिस तपासात उघड झाले आहे की बीड शहरात काही दिवसांपूर्वी हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठकाही घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत जरांगे पाटलांच्या ओळखीतील काही व्यक्ती उपस्थित होत्या. या बैठकीतच हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची डील ठरल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच गंगाधर काळकुटे यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने बीडमध्ये मध्यरात्री छापा टाकत दोघांना ताब्यात घेतले.
जरांगे पाटील यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
या गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांनी स्वतः रात्री उशिरा जालना पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली. ते म्हणाले, “मराठा आरक्षण चळवळीला कमकुवत करण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहेत, पण आम्ही मागे हटणार नाही. आमच्या जीवावर बेतला तरी समाजासाठी लढू.”
राज्यभरात खळबळ
या कटामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कारण जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते असून, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठे आंदोलन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर येणे ही गंभीर बाब मानली जात आहे. या कटामागे राजकीय शक्तींचा हात आहे का, हा प्रश्न आता राज्यभर चर्चेत आहे.
सुरक्षेत वाढ
पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना अतिरिक्त पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. सरकारने या प्रकरणातील सर्व दोषींना कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन दिले आहे.
मराठा आरक्षण चळवळीच्या पार्श्वभूमीवर उघड झालेला हा कट राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणारा ठरत आहे.