Breaking
Updated: May 28, 2025
WhatsApp Group
Join Nowकेज – अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोघांना झाडाला बांधून सात जणांनी काठी आणि चामडी बेल्टने केलेल्या अमानुषपणे मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ मे रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहा आरोपींपैकी एक अल्पवयीन आरोपी वगळता पाच जणांना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
भाटुंबा येथील दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे (वय २७) व त्याचा मित्र सचिन भास्कर करपे (रा. जवळबन ता. केज) हे दोघे २६ मे रोजी दुचाकीवरून जात असताना अनैतिक संबंधाच्या संशयावरून रोहन मस्के, सोन्या मस्के (दोघे रा. सावळेश्वर ता. केज) व लाडेगाव येथील इतर पाच जणांनी त्यांना अडवून त्या दोघांना रोहन मस्के याच्या मामाच्या शेतात नेऊन त्यांना झाडाला बांधून या सात जणांनी लाकडी काठीने व चामडी बेल्टने अमानुषपणे मारहाण केली.
त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत कळंब – अंबाजोगाई रस्त्यावरील पावनधामजवळ असलेल्या रस्त्यावर टाकून दिले. तर उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेलेल्या दगडू उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे याचा मृत्यू झाला होता. मयताचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे यांच्या तक्रारीवरून रोहन मस्के, सोन्या मस्के व इतर पाच जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या प्रकरणात तपासी अधिकारी सपोनि मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी तपासाची चक्रे फिरवून वैभव शंकर मस्के, रोहित शंकर मस्के, सुहास हिराचंद पाटोळे, रोहन अशोक धीरे, अन्सार युनूस पठाण या पाच जणांसह एका अल्पवयीन मुलास अटक केली होती. त्यांना न्यायालयात दाखल केले असता या पाच संशयित आरोपींना ३० मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.