Breaking
Updated: जून 18, 2026
माकेगाव येथे आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते ५० लाखांच्या पुलाचे भूमिपूजन; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई।(प्रतिनिधी) : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथील नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. जिल्हा परिषदेअंतर्गत या पुलासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या पुलामुळे ग्रामस्थ आणि भाविकांची अनेक वर्षांची मोठी गैरसोय आता दूर होणार आहे.
माकेगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या एकमुखी दत्त मंदिरासमोरील पुलाचे हे बांधकाम होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे हिंदूलाल काकडे, विलास सोनवणे, दिलीप देशमुख,तानाजी देशमुख, कैलास शिंदे, गणेश भोसले, बाळासाहेब मामडगे, शंकर उबाळे,बाबा शेळके, वसंतराव शिंपले, लिंगेश्वर तोडकर यांच्यासह विविध पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजनानंतर बोलताना आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या, अनेक वर्षांनंतर या पुलाचे काम सुरू होत असल्यामुळे आज मनापासून आनंद होत आहे. माकेगाव हे आकाराने छोटे गाव असले तरी येथे अत्यंत सक्षम पुढारी आहेत. तुमच्या सर्व अडचणी आम्ही प्रामाणिकपणे काम करून सोडवत आहोत. या पुलाचे काम अत्यंत दर्जेदार झाले पाहिजे आणि संबंधित ठेकेदाराने हे काम पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण करावे. कार्यक्रमाला येण्यास काहीसा उशीर झाल्याबद्दल त्यांनी अत्यंत नम्रपणे ग्रामस्थांची माफीही मागितली.
गावच्या विकासाचा शब्द देताना आमदार मुंदडा यांनी सांगितले की, या भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. यापूर्वी याच ठिकाणी तीर्थक्षेत्र योजनेतून ५० लाख रुपयांचा सभामंडप देखील देण्यात आला आहे, ज्यामुळे भाविकांची सोय झाली आहे. येणाऱ्या काळात राज्य सरकारचे अधिवेशन सुरू होणार असल्याची माहिती देत आमदार नमिता मुंदडा यांनी नागरिकांना आवाहन केले की, अधिवेशनासाठी तुमचे काही प्रश्न, मागण्या किंवा म्हणणे असेल तर ते मला नक्की सांगा. तुमच्या अडचणी आणि मतदारसंघाचे प्रश्न मी अधिवेशनात आक्रमकपणे मांडेन. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपून पुलाचे काम सुरू झाल्यामुळे माकेगाव परिसरातील नागरिकांनी व भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.