Breaking
गेवराई (प्रतिनिधी) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गढी गावाजवळील उड्डाणपुलावर सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुभाजकात अडकलेली गाडी बाहेर काढणाऱ्या तरुणांना जोरदार धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब आतकरे यांच्या एक्सयूव्ही वाहनाचा गढी कारखान्यासमोर किरकोळ अपघात झाला होता. यात कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. मात्र, गाडी महामार्गाच्या दुभाजकात अडकलेली असल्याने ती बाहेर काढण्यासाठी बाळासाहेब आतकरे आणि त्यांचे काही सहकारी सोमवारी रात्री घटनास्थळी आले होते.
गाडी काढण्याचे काम सुरू असतानाच भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने या सातही जणांना जबर धडक दिली. या धडकेत बाळासाहेब उर्फ बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सूरय्या, भागवत परळकर आणि सचिन ननवरे या सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन व ट्रक ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात शोककळा पसरली आहे.
Last Updated: May 27, 2025
Share This Post