Breaking
Updated: July 1, 2025
WhatsApp Group
Join Nowदुसऱ्या डॉक्टरच्या नियुक्तीची आ. नमिता मुंदडांनी केली आरोग्यमंत्र्याकडे मागणी
केज – केज तालुक्यातील विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर मागील तीन महिन्यापासून गैरहजर असल्याने त्याचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला आहे. याची दखल घेत आमदार नमिता मुंदडा यांनी गैरहजर डॉक्टरची आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून त्या डॉक्टरच्या जागी दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
विडा (ता. केज) येथील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ४२ गावांतील ६० हजार लोकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. या केंद्राअंतर्गत मस्साजोग, येवता, जिवाचीवाडी, दहिफळ ( वडमाऊली ), शिंदी या उपकेंद्र आहेत. केंद्रा अंतर्गत येत असलेली कोरडेवाडी, काचरवाडी, लेमनदरा, पिराचीवाडी, लिंबाचीवाडी, बुरंडवाडी, हरगडवाडी, गौरवाडी, आंधळेवाडी, बेंगळवाडी, काशीदवाडी, तुकुचीवाडी, नामेवाडी, गप्पेवाडी, घाटेवाडी, जिवाचीवाडी, काळूचीवाडी ही गावे डोंगरी व दुर्गम भागात आहेत. या केंद्रात डॉक्टरची दोन पदे मंजूर असून दोन डॉक्टरपैकी एक डॉक्टर हा मागील तीन महिन्यापासून आरोग्य केंद्रात येत नसून तो डॉक्टर गैरहजर आहे. केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला आहे. तर उपचारासाठी वाडी, वस्ती, तांड्यावरून येणारे गोरगरीब रुग्ण त्रस्त झाले असून रुग्णांतून संताप व्यक्त केला जात आहे. संबंधीत गैरहजर डॉक्टरला तातडीने हजर होण्यासंदर्भात सूचना महत्वाचे आहे. अथवा त्या डॉक्टरच्या जागी दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करून रुग्णसेवा सुरळीत करणे अत्यंत गरजेचे आहे. या आरोग्य केंद्रात डॉक्टराच्या गैरहजेरीमुळे रुग्णसेवेवर होत असलेला गंभीर परिणाम पाहता संबंधीत गैरहजर डॉक्टरांना तातडीने हजर होण्याचे आदेश देण्यात यावेत. अथवा त्या डॉक्टरच्या जागी दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी, अशी केजच्या आ. नमिता मुंदडा यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.
डॉक्टरअभावी रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा पर्याय
प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज ओपीडीला शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. रुग्णांची गर्दी कायम असते. तर शनिवारी आठवडी बाजार दिवशी दोनशेहून अधिक रुग्ण ओपीडीला असतात. मात्र सुविधा नसल्याने रुग्णांना पुढे जावे लागते. तर आता डॉक्टर नसल्याने खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असून रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
विडा येथील आरोग्य केंद्रातील थोरात नामक डॉक्टर अनाधिकृतपणे गैरहजर असल्याचे आणि दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करण्यासंदर्भात वरिष्ठांना कळविले आहे.
अशोक गवळी तालुका आरोग्य अधिकारी, केज.