Breaking

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बीडमधील शेतकऱ्यांची वज्रमुठ

Updated: July 5, 2025

By Vivek Sindhu

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बीडमधील शेतकऱ्यांची वज्रमुठ

WhatsApp Group

Join Now

कृषिदिनी जिल्हाभर तीव्र रास्ता रोको आंदोलन

बीड : शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेणाऱ्या आणि त्यांना देशोधडीला लावणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात बीड जिल्ह्यातील शेतकरी आता चवताळून उठले असून मंगळवारी कृषिदिनाच्या दिवशी जिल्हाभर जोरदार रास्ता रोको करून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

परळी व अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर, धायगुडा पिंपळा, तळेगाव येथे शेकडो शेतकरी महिला व पुरुष रस्त्यावर उतरले. ‘जमीन आमची, हक्क आमचा’, ‘महामार्ग रद्द झाला पाहिजे’, ‘शासन हाय हाय’ अशा घोषणा देत महामार्ग रद्द करण्याची ठाम मागणी करत आंदोलन करण्यात आले.

शासनाने खोटी आश्वासने आणि पोलिसी बळ वापरून सीमांकन सुरू केले असून अधिकारी शेतकऱ्यांना धमकावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. मात्र आता शेतकरी मूग गिळून गप्प बसणार नाही, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी इशारा दिला. धायगुडा पिंपळा येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दुपारी मुक्त केले.

या आंदोलनात एड. अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे, मोहन गुंड, कॉ. भगवान बडे, कॉ. मदन वाघमारे, व्यंकट ढाकणे, सुशील शिंदे, अरुण पाटील, दीपक शिंदे, एड. जावेद पटेल, मीनाताई डांगे, आशाबाई पवार आदींसह शेकडो शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोकोत सहभाग घेतला.

“सरकार शेतकऱ्यांना भूमिहीन करत असून पोलिसी बळ आणि दडपशाहीचा वापर करून जमीन बळकावण्याचा डाव रचत आहे. बीड जिल्ह्यातील अधिकारी शेतकऱ्यांना धमकावत आहेत. हे आंदोलन जर दुर्लक्षित झाले, तर यापेक्षा प्रचंड भडका उडेल,” असा स्पष्ट इशारा किसान सभेचे ॲड. अजय बुरांडे यांनी दिला.