Breaking
Updated: डिसेंबर 29, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण, अन्न व वितरण मंत्रालयाने १८ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या नवीन अधिसूचनेमुळे व्यापारी वर्गामध्ये वजन आणि मापांच्या पडताळणीबाबत मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बीड विभागाचे वैध मापनशास्त्र निरीक्षक गणेश मिसाळ यांनी अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्ध केले असून, इलेक्ट्रॉनिक काट्यांची पडताळणी पूर्वीप्रमाणेच दर १२ महिन्यांनी म्हणजेच दरवर्षी करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे व्यापाऱ्यांनी कोणत्याही गैरसमजात राहू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने वैध मापनशास्त्र (सामान्य) नियम २०११ मधील नियम २७ (२) (क) मध्ये महत्त्वाची सुधारणा केली आहे. या नवीन नियमानुसार आता सर्व प्रकारची वजने, धारिता मापे, लांबी मोजमापे, टेप, बीम स्केल, काउंटर मशीन आणि विशेषतः पेट्रोल-डिझेलच्या इंधन डिस्पेंसरसाठी पडताळणीची मुदत २४ महिने करण्यात आली आहे. १८ डिसेंबर २०२५ पूर्वी इंधन डिस्पेंसरची पडताळणी दरवर्षी करावी लागत होती, मात्र आता ती दोन वर्षांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. या सुधारणेनंतर काही व्हॉट्सॲप मेसेज आणि अनधिकृत प्रेस नोटद्वारे इलेक्ट्रॉनिक काट्यांची मुदतही २४ महिने झाल्याची अफवा पसरली होती.
वैध मापनशास्त्र विभागाने यावर अधिकृत खुलासा करताना सांगितले की, नवीन अधिसूचनेत केवळ ठराविक यांत्रिक उपकरणांचा आणि इंधन डिस्पेंसरचा समावेश करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांच्या पडताळणीच्या मुदतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्व व्यापारी बंधूंनी आपल्याकडील इलेक्ट्रॉनिक काट्यांची पडताळणी दर १२ महिन्यांनी म्हणजेच एका वर्षाच्या आत करून घेणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे आणि कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे पत्रक निरीक्षक गणेश मिसाळ यांनी जारी केले आहे.