Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

साड्या वाटपाचे आमिष दाखवून वृद्धेला लुटले

Updated: फेब्रुवारी 11, 2026

By Vivek Sindhu

साड्या वाटपाचे आमिष दाखवून वृद्धेला लुटले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव: साड्या आणि रोख रक्कम वाटपाचे आमिष दाखवून दोन अज्ञात भामट्यांनी एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला भरदिवसा लुटल्याची धक्कादायक घटना माजलगाव शहरात घडली आहे. मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानक परिसरातील एसबीआय बँकेसमोर ही घटना घडली. सत्यभामा बाबासाहेब कदम (वय ६५, रा. शिवाजीनगर) या बँकेत जात असताना, दोन भामट्यांनी त्यांना गाठून ७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

फिर्यादी सत्यभामा कदम या घरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी सकाळी त्या कामानिमित्त एसबीआय बँकेत जात होत्या. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना वाटेत थांबवले. “शिवाजी महाराज चौकात साड्या आणि १५ हजार रुपयांचे वाटप सुरू आहे, तुम्ही आमच्यासोबत चला,” असे सांगून या भामट्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर या चोरट्यांनी त्यांना जवळच असलेल्या माऊली स्वीटमार्टच्या बोळातील एका ओट्यावर नेऊन बसवले. तिथे बोलण्यात गुंतवून शिताफीने त्यांच्या गळ्यातील ३ ग्रॅमचे सोन्याचे मणी, २ ग्रॅमची सोन्याची फुले, एक मोबाईल आणि रोख १ हजार रुपये असा एकूण ७ हजार रुपयांचा माल लंपास केला. चोरी झाल्याचे लक्षात येताच महिलेने आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते.

याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यताल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय गायकवाड पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts