Breaking
गेवराई : दुचाकी काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार, २३ मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उमापूर येथे घडली. विहिरीत पाणी आणि त्यामध्ये पसरलेले पेट्रोल यामुळे दोघांचाही श्वास गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. तब्बल २२ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
मृतांची नावे दिपक धर्मा मोरे आणि अनील शामलाल सोनवणे अशी असून दोघेही रहाता, ता. शिर्डी येथील रहिवासी आहेत. उमापूरजवळील मालेगाव रस्त्यावर हवाले यांची विहीर आहे. याच विहिरीत एक दुचाकी पडल्याची माहिती मिळाल्यानंतर ती बाहेर काढण्यासाठी हे दोघे तरुण विहिरीत उतरले होते.
मात्र, विहिरीतील पाण्यात पसरलेल्या पेट्रोलमुळे श्वास कोंडल्याने ते पाण्यातच बुडाले. घटनेच्या वेळी काही लोक विहिरीच्या आसपास उपस्थित होते, परंतु विहीर खोल असल्याने आणि परिस्थिती बिकट झाल्यामुळे वेळेत मदत पोहोचू शकली नाही.
घटनेची माहिती मिळताच चकलांबा व उमापूर येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विद्युत पंपाच्या साहाय्याने विहिरीतील पाणी उपसण्यात आले. तब्बल २२ तासांच्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, सदर दुचाकी विहिरीत कशी पडली? तिला कोणी टाकले? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Last Updated: May 24, 2025
Share This Post