Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईत फिजिशियन्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. नवनाथ घुगे तर सचिवपदी डॉ. राहुल धाकडे यांची बिनविरोध निवड

Updated: जानेवारी 17, 2026

By Vivek Sindhu

InShot 20260117 163907975 scaled

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: येथील प्रसिद्ध हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ. नवनाथ घुगे यांची ‘असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’च्या (API) अंबाजोगाई शाखा अध्यक्षपदी, तर सचिव म्हणून छातीविकार तज्ज्ञ डॉ. राहुल धाकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष बैठकीत ही नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. देशपातळीवर कार्यरत असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून अंबाजोगाई, केज, धारूर आणि परिसरातील सर्व फिजिशियन्सना एकत्र आणणे आणि त्यातून सामाजिक हित जोपासणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.

ज्येष्ठ फिजिशियन डॉ. एन. पी. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी फिजिशियन्सना संघटित करून वैद्यकीय कार्याची व्याप्ती वाढवण्याची भूमिका मांडण्यात आली. नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून डॉ. अनिल मस्के आणि डॉ. सचिन चौधरी यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. अतुल शिंदे, कोषाध्यक्ष म्हणून डॉ. विवेक मुळे तर सहकोषाध्यक्षपदी डॉ. इम्रान पटेल यांची नियुक्ती झाली. संघटनेचे मार्गदर्शक म्हणून डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. एन. पी. देशपांडे, डॉ. शुभदा लोहिया आणि डॉ. संजय चव्हाण काम पाहणार आहेत.

अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. नवनाथ घुगे मागील २१ वर्षांपासून अंबाजोगाईत ‘घुगे हॉस्पिटल’च्या माध्यमातून अतिगंभीर रुग्णांना आयसीयू सेवा पुरवत आहेत. रुग्णसेवेसोबतच विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. यापूर्वी त्यांनी आय.एम.ए. (IMA) च्या सचिव आणि अध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यांच्या याच प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांची ए.पी.आय.च्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. सचिव डॉ. राहुल धाकडे हे देखील आय.एम.ए. चे विद्यमान अध्यक्ष असून श्वसन विकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, अंबाजोगाई शाखेच्या वतीने आगामी काळात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे, नवनवीन वैद्यकीय परिषदांचे आयोजन करणे आणि ग्रामीण भागातील रुग्णसेवेत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाची सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आव्हाने आणि समस्यांवर मात करत एक विधायक कार्य उभे करण्याचा संकल्प नवनियुक्त अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे यांनी यावेळी व्यक्त केला.

या निवडीबद्दल डॉ. गोपाळ पाटील, डॉ. संदीप थोरात, डॉ. अविनाश मुंडे, डॉ. वासंती चव्हाण, डॉ. नागोराव डेरनासे, डॉ. शरद साबळे, डॉ. दिपक कटारे, डॉ. शाहिद, डॉ. राहुल गुट्टे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. योगिनीताई थोरात, डॉ. अस्वले, डॉ. ब्रम्हा डोईफोडे यांच्यासह परिसरातील अनेक वरिष्ठ डॉक्टरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


Categories

Recent Posts