Breaking

जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशासाठी दस्तगीरवाडी ग्रामपंचायतीचा अभिनव पुढाकार

Updated: जून 18, 2026

By Vivek Sindhu

53 3 5

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘एक मूल–एक झाड’ उपक्रमासह घरपट्टी-नळपट्टीतही सवलत

अंबाजोगाई प्रतिनिधी : ग्रामीण भागातील पालकांचा आपल्या पाल्यांना खासगी व कॉन्व्हेंट शाळांमध्ये प्रवेश देण्याकडे वाढता कल पाहता, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी दस्तगीरवाडी ग्रामपंचायतीने प्रेरणादायी पुढाकार घेतला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी, १५ जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दस्तगीरवाडी येथे प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ‘एक मूल–एक झाड’ या संकल्पनेअंतर्गत ग्रामपंचायतीतर्फे एक फळझाड भेट देण्यात आले. या उपक्रमामागे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याबरोबरच शाळेप्रती आपुलकी वाढविण्याचा उद्देश असल्याचे सरपंच धनंजय माने यांनी सांगितले.

याचबरोबर, जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना चालू वर्षाची घरपट्टी व नळपट्टी भरण्यापासून सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही मोठा दिलासा मिळणार असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्यावा, हा यामागील हेतू आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती औताडे यांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत गावातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दस्तगीरवाडी येथे प्रवेश देण्याचे आवाहन केले आहे.

ग्रामपंचायतीचा हा अभिनव उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, शिक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची सांगड घालणारा हा निर्णय इतर ग्रामपंचायतींसाठीही आदर्श ठरेल, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांच्याकडून व्यक्त होत आहे.


Categories

Recent Posts