Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

मका देण्याच्या बहाण्याने चौसाळ्यातील व्यापाऱ्याची १० लाख ४० हजारांची ऑनलाइन फसवणूक

Updated: जानेवारी 14, 2026

By Vivek Sindhu

Picsart 26 01 14 21 54 59 220 scaled

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: स्वस्त दरात मका देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याला तब्बल १० लाख ४० हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाजेर मस्जीद सौदागर यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चौसाळा येथील रहिवासी असलेले नाजेर मस्जीद सौदागर यांचा सौदागर पोल्ट्री फॉर्म आणि सौदागर ट्रेडर्स नावाचा व्यवसाय आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी त्यांना फिरोज नसीम खान नावाच्या व्यक्तीचा फोन आला. आपल्याकडे १५० टन मका असून तो सुलतानपूर येथील गोदामात असल्याचे त्याने सांगितले. सौदागर यांनी त्याच्याकडून ७५ टन मका घेण्याचे ठरवले. व्यवहार पक्का झाल्यावर फिरोज खान याने पैसे पाठवल्याशिवाय गाड्या पाठवणार नाही असे सांगितले. विश्वासापोटी सौदागर आणि त्यांच्या मुलाने मिळून फिरोज खान याच्या बँक खात्यावर आणि ड्रायव्हरच्या फोन पे नंबरवर एकूण १० लाख ४० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले.

पैसे मिळाल्यावर ८ जानेवारीपर्यंत माल पोहोचेल असे आश्वासन आरोपीने दिले होते, मात्र मुदत उलटूनही मका मिळाला नाही. त्यानंतर आरोपीने आपला फोन बंद करून सौदागर यांच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नाजेर सौदागर यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी आरोपी फिरोज नसीम खान आणि त्याचा ड्रायव्हर यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक निलेश केले या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts