Breaking
Updated: जून 26, 2026
'अमृत-आनंद सोहळ्या'चे रविवार २८ जून रोजी अंबाजोगाईत आयोजन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या, समाजसेविका तथा दिनदयाळ बँकेच्या पूर्व अध्यक्षा सौ.शरयू शरदराव हेबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘नंदादीप’ या विशेष कार्यक्रमाचे अंबाजोगाईत आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि.२८ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता साधना मंगल कार्यालय, अंबाजोगाई – लातूर रोड, अंबाजोगाई येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. या अमृत महोत्सव सोहळ्यास राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांता अक्का यांचे आशीर्वाद लाभणार असून, यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सामान्य कुटुंबातून येऊन राष्ट्र सेविका समितीच्या कार्यातून समाज जीवनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सौ.शरयू शरदराव हेबाळकर यांच्या ७५ वर्षांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सेविका, स्वयंसेवक तसेच नातेवाईक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी हीच निमंत्रण पत्रिका समजून उपस्थित राहण्याचे आवाहन ऍड.मकरंद पत्की (संयोजक, अमृत महोत्सव समिती, अंबाजोगाई.) यांनी केले आहे.
सौ.शरयूताई हेबाळकर यांचे योगदान :
शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे. कोणतेही कार्य करीत असतांना समर्पित सेवाभाव ठेवून प्रामाणिकपणे त्या कार्यात स्वतःला झोकून देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई येथे त्यांनी शिक्षिका म्हणून सेवा केली आहे. ज्ञानदान करीत असतांना त्यांनी उत्तम विद्यार्थी घडविले. कुटुंब, शैक्षणिक कार्य या जबाबदाऱ्या सांभाळत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिलांसाठी असलेली शाखा राष्ट्र सेविका समितीच्या कार्यात त्यांनी स्वतःला अग्रभागी ठेवले, एवढेच नव्हे तर त्यांच्या संस्कारामुळे त्यांचे कुटंबही सेवाकार्याकडे प्रेरित झाले व त्यांनीही या कार्यात पूर्ण योगदान दिले आहे. सौ.शरयूताई या सन १९७० पासून राष्ट्रसेविका समितीच्या कार्यात विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. सन १९७८ ते १९८० या कालावधीत त्यांनी पुर्व आफ्रीकेत, केनिया, नैरोबी येथे त्यांनी हिंदु सेविका समितीच्या कार्यासाठी स्वतः वास्तव्यास राहून नैरोबी येथे कार्यसंघाची प्रथम शाखा सुरू केली. दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान असून स्थापनेपासून त्या बँकेच्या संचालक मंडळात कार्यरत आहेत. आज त्या दीनदयाळ बँकेच्या विद्यमान संचालिका आहेत. तसेच बँकेच्या पुर्व अध्यक्षा म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. सौ.शरयूताई यांना जागतिक महिला दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०१६-१७’ मध्ये प्राप्त झालेला आहे. एक आदर्श महिला, शिक्षिका, समाजसेविका, सहकार भारतीतील अभ्यासू कार्यकर्ता नेतृत्व आणि आदर्श व्यक्तिमत्व याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे सौ.शरयूताई शरदराव हेबाळकर या होय.