Breaking
Updated: जून 19, 2026
बालभारती सहावीच्या पुस्तकात दोन पानांचा धडा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: आपल्या जीवाची पर्वा न करता एका बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवणाऱ्या बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी येथील धाडसी बालक रोहन रामचंद्र बहिर याची शौर्यगाथा आता थेट शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) इयत्ता सहावीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात रोहनच्या या थरारक आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित दोन पानांचा एक स्वतंत्र धडा समाविष्ट केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना रोहनच्या धैर्याची आणि सामाजिक भान जपण्याची प्रेरणा मिळणार आहे. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक दिलीप फलटणकर यांनी या पाठाचे अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.
काही वर्षांपूर्वी नवगण राजुरी येथील नदीपात्रावर छाया गायकवाड नावाच्या महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाय घसरल्याने त्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून जाऊ लागल्या. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या या महिलेला वाचवण्यासाठी तिथे सायकल धुण्यासाठी आलेल्या रोहन बहिरने क्षणभराचाही विचार न करता थेट नदीच्या पात्रात उडी घेतली. पाण्याचा वेग प्रचंड असतानाही रोहनने अत्यंत धैर्याने नदीच्या प्रवाहाशी झुंज देत छाया गायकवाड यांना सुखरूपपणे नदीबाहेर काढले आणि त्यांना जीवदान दिले. ग्रामीण भागातील एका सामान्य मुलाने दाखवलेल्या या अद्भूत धाडसाची दखल थेट राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली होती.
रोहनच्या या शौर्याबद्दल त्याला नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाचा सर्वोच्च ‘राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. रोहनचे हे धाडस केवळ कौतुकापुरते मर्यादित न राहता राज्यातील इतर बालकांसाठी आदर्श ठरावे, याच उद्देशाने बालभारतीने हा धडा अभ्यासक्रमात आणला आहे. रोहनचे वडील रामचंद्र बहिर हे शेतकरी असून आई आरोग्य विभागात कार्यरत आहे. आपल्या मुलाच्या शौर्याची कथा थेट राज्याच्या मुख्य अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याने पालकांचा ऊर अभिमानाने भरून आला असून त्यांनी याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केला आहे.
या संपूर्ण घटनेत रोहनने केवळ शौर्यच दाखवले नाही, तर त्याचे सामाजिक भानही दिसून आले होते. नदीतून वाचवल्यानंतर कृतज्ञता म्हणून छाया गायकवाड यांनी रोहनला कौतुकादाखल ५०० रुपयांचे बक्षीस दिले होते. मात्र, रोहनने ती बक्षीसाची रक्कम स्वतःकडे न ठेवता गावातील गणेश मंडळाला सुपूर्द करून सामाजिक जबाबदारीचे एक वेगळे उदाहरण समाजासमोर ठेवले होते, ज्याचा उल्लेखही या निमित्ताने कौतुकाचा विषय ठरत आहे.