Breaking
Updated: जून 15, 2026
युवा नेते अक्षय मुंदडांनी केली प्रत्यक्ष पाहणी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शहरात आगामी पावसाळा लक्षात घेता स्वच्छता आणि पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्यासाठी नगरपरिषदेने व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते अक्षय मुंदडा यांनी विविध भागांत सुरू असलेल्या स्वच्छता कामांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. पावसाळ्यात निर्माण होणारी पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या जयवंती नदीपात्रात वर्षभर साचलेला कचरा, प्लास्टिक, गाळ आणि इतर घाण जेसीबीच्या साहाय्याने काढण्याचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. पावसाळ्यात नदी व नाल्यांमध्ये कचरा साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळित होऊन अनेक सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. ही संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी यंदा नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वीच विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
जयवंती नदीसह शहरातील प्रमुख नाले, पाण्याच्या वाहिन्या आणि सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करण्यात येत आहे. अक्षय मुंदडा यांनी या कामांचा आढावा घेताना कामांची गुणवत्ता आणि गती यावर विशेष भर देत संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यात नगरसेवक संजय गंभीरे, महेश आंबाड, माजी नगरसेवक संतोष शिनगारे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत धायगुडे, अमोल पवार, राम घोडके, बिभीषण भालेकर आणि स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
दरम्यान, अक्षय मुंदडा यांनी सर्व्हे क्रमांक १७ येथे उभारण्यात आलेल्या मोकाट कुत्र्यांच्या शेल्टर हाऊसलाही भेट दिली. शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी उभारण्यात आलेल्या या केंद्रातील सुविधा, व्यवस्थापन आणि आवश्यक सुधारणांबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. नदी, नाले आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता नागरिकांनी घंटागाड्यांचा वापर करावा आणि शहर स्वच्छतेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
“स्वच्छ अंबाजोगाई, सुरक्षित अंबाजोगाई”
पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, पाणी तुंबण्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत आणि शहरातील स्वच्छता अबाधित राहावी यासाठी नगरपरिषदेची स्वच्छता मोहीम आगामी काळात आणखी व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
– नंदकिशोर मुंदडा (नगराध्यक्ष अंबाजोगाई)