Breaking
Updated: जून 10, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी: शेतात सुरू असलेले पाईपलाईनचे विनापरवाना खोदकाम थांबविल्याचा राग मनात धरून एका महावितरण कर्मचाऱ्याला आणि त्यांच्या मुलाला स्कॉर्पिओ गाडीने पाठीमागून जोराची धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ‘मी परळीचा गुंड आहे, तुला लय महागात पडेल’ अशी धमकी देत आरोपींनी हे कृत्य केले असून, याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राजेभाऊ रंगराव राठोड (वय ५१, रा. शिवाजीनगर, सिरसाळा, मूळ रा. वंजारवाडी, मोहा, ता. परळी) हे महावितरण कंपनीत ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. मौजे पोहनेर शिवारातील त्यांच्या शेतात राहुल अरुण टाक हा जेसीबीच्या साहाय्याने पाईपलाईनचे खोदकाम करत होता. राठोड यांनी हे काम थांबवण्यास सांगितले असता, राहुलने त्यांना फोन करून ‘मी परळीचा गुंड आहे, तुला दाखवितो’ अशी धमकी दिली. त्यानंतर राजेभाऊ आणि त्यांचा मुलगा वैभव हे दोघे दुचाकीवरून पोहनेर गावाकडे जात असताना, आरोपी राहुल टाक, महेश टाक, अनिल टाक आणि रोहित उर्फ ऋषी गनोरकर यांनी पांढऱ्या रंगाच्या विनानंबरच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांच्या दुचाकीला जिवे मारण्याच्या उद्देशाने पाठीमागून जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत पिता-पुत्र रस्त्याच्या बाजूला फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले, तसेच त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. घटनेनंतर आरोपी गाडीसह घटनास्थळावरून पसार झाले. जखमींवर परळी येथे उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी सिरसाळा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ३(५), ३२४(२) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बाबा भिलू राठोड पुढील तपास करत आहेत.