Breaking

कर्तव्यावर परतण्यापूर्वीच काळाचा घाला; आष्टीजवळ टेम्पोच्या धडकेत सीआरपीएफ जवानाचा दुर्दैवी मृत्यू

Updated: मे 18, 2026

By Vivek Sindhu

कर्तव्यावर परतण्यापूर्वीच काळाचा घाला; आष्टीजवळ टेम्पोच्या धडकेत सीआरपीएफ जवानाचा दुर्दैवी मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील धानोरा येथील संतोषी माता चौकाजवळ रविवारी सकाळी भरधाव टेम्पोने दिलेल्या भीषण धडकेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान विष्णू पोपट शेळके यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यप्रदेशातील भोपाळ येथे कार्यरत असलेले विष्णू शेळके आपली सुट्टी संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू होणार होते. देशसेवेसाठी निघण्यापूर्वी थोडा वेळ मित्रांना भेटून दुचाकीने परतत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. भरधाव छोटा हत्ती टेम्पोने समोरून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.

रविवार, १७ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास विष्णू शेळके हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH 23 AP 4795) महामार्गावरील डिव्हायडरवरून वळण घेत होते. याच वेळी जामखेडकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव छोटा हत्ती टेम्पोने (क्रमांक MH 12 SX 8433) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेत विष्णू शेळके गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. देशसेवेसाठी सज्ज झालेल्या जवानाचा अशा अपघाती निधनाने संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवार, १८ मे रोजी सकाळी धानोरा येथे शासकीय इतमामात आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल आणि सीआरपीएफच्या पुणे येथील पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आपल्या या शूर सहकाऱ्याला अखेरची सलामी दिली. विष्णू शेळके यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार असून, त्यांच्या जाण्याने शेळके कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Categories

Recent Posts