Breaking

प्रशासकीय अनास्थेविरोधात बीड बायपासवर शेतकऱ्यांचा एल्गार; सर्विस रोडसाठी भव्य रस्ता रोको

Updated: मे 18, 2026

By Vivek Sindhu

प्रशासकीय अनास्थेविरोधात बीड बायपासवर शेतकऱ्यांचा एल्गार; सर्विस रोडसाठी भव्य रस्ता रोको

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड बायपासवरील इमामपूर रोड येथे सर्विस रोड आणि स्लिप रोडचे अंतर ६०० मीटरने वाढवण्याच्या न्याय्य मागणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी सोमवार, १८ मे रोजी सकाळी दहा वाजता सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर भव्य रस्ता रोको आंदोलन केले. आपल्या हक्काच्या मागणीसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सातत्याने होणाऱ्या ढिसाळ आणि दुर्लक्षित कारभारामुळे संतप्त झालेल्या कोल्हारवाडी, समनापूर, इमामपूर आणि शिंदे वस्ती येथील शेतकरी बांधवांनी महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सुभाष राऊत आणि रामभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने हे आंदोलन छेडले.

सोलापूर ते धुळे हा राष्ट्रीय महामार्ग वर्ष २०१९-२० मध्ये बी.ओ.टी. तत्त्वावर पूर्ण करण्यात आला आहे. मात्र, हा रस्ता तयार करताना छत्रपती संभाजी राजे चौक ते इमामपूर रोड दरम्यान महामार्गाची उंची प्रचंड वाढवण्यात आली आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना स्थानिक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आहेत. रस्त्याची उंची अवाजवी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या हक्काच्या शेतात जाणे आणि शेतीची कामे करणे पूर्णपणे अशक्य झाले आहे. सध्या या भागात स्लिप रोड आणि सर्विस रोडचे काम मंजूर असून ते प्रगतीपथावर आहे. याच दरम्यान समनापूरकडे जाणारा २० फुटांचा रस्ता आहे. जर इमामपूर रोड ते छत्रपती संभाजी राजे चौक या स्लिप रोडचे अंतर अवघे ६०० मीटरने वाढवले, तर शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न सुटू शकतो आणि अनेक गावांना याचा मोठा दिलासा मिळू शकतो.

आपल्याच जमिनी असूनही केवळ प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे उद्भवलेल्या या समस्येबाबत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार दाद मागितली होती. मात्र, अनेकदा लेखी पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. अखेर सहनशीलतेचा अंत झालेल्या बीड परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी भर उन्हात रस्त्यावर उतरून प्रशासकीय अनास्थेचा तीव्र निषेध केला. या आंदोलनानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्प संचालकांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या भव्य रस्ता रोको आंदोलनात वामन लिंबाजी शिंदे, दिगंबर तुलसीराम शिंदे, अंकुश तुळशीराम शिंदे, मच्छिंद्र बाबुराव वाणी, रवींद्र मच्छिंद्र माने, जयदीप पांडुरंग पवार, भगवान लिंबाजी शिंदे, प्रविण पालीमकर यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Categories

Recent Posts