Breaking

पत्नीनेच केला पतीचा ‘गेम‘!

Updated: मे 3, 2026

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2026 05 03 at 9.25.46 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आठ महिन्यांपूर्वीच्या गेवराईतील खुनाचा पोलिसांनी लावला छडा, पत्नीसह मेहुणी आणि साडू अटकेत

गेवराई: गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाचा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने छडा लावला आहे. कौटुंबिक छळाला कंटाळून पत्नीने आपल्या बहिणीच्या आणि साडूच्या मदतीने पती उद्धव तुकाराम शिंदे (वय ५०) यांची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या क्रूर घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह आणि दुचाकी गोदावरी नदीत फेकून दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिघांना अटक केली असून, मुलाने व्यक्त केलेल्या संशयामुळे या थंड डोक्याने केलेल्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे.

ही घटना ३ सप्टेंबर २०२५ ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान घडली होती. पुणे येथे राहणारे उद्धव शिंदे आणि त्यांची पत्नी संगीता हे गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे नातेवाईक विष्णू वाजे आणि सविता वाजे यांना भेटण्यासाठी आले होते. मयत उद्धव शिंदे हे पत्नीला वारंवार त्रास देऊन मारहाण करत असल्याने त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादाचे पर्यावसान हत्येत झाले. संगीता शिंदे हिने तिची बहीण सविता आणि साडू विष्णू वाजे यांच्या मदतीने पतीचा काटा काढला. हत्येनंतर विष्णू वाजे याने आपल्या दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवरून शहागड येथील जुन्या पुलावरून गोदावरी नदीत फेकून दिला. त्यानंतर दोन दिवसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही नदीपात्रात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

आपले बिंग फुटू नये यासाठी मुख्य आरोपी पत्नी संगीता शिंदे हिने पुणे येथील सिंहगड पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, मयताचा मुलगा शुभम शिंदे याला वडिलांसोबत काहीतरी अघटित घडल्याची शंका होती. शुभमने गेवराई पोलिसांकडे आपली शंका व्यक्त केल्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी संशयित आरोपी विष्णू वाजे आणि सविता वाजे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून गोदावरी नदीतून मयताच्या दुचाकीचा सांगाडा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके करत आहेत.


Categories

Recent Posts