Breaking
Updated: एप्रिल 12, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील सेलू आंबा टोल नाक्यावर शनिवारी पहाटे एका टोळक्याने दहशत निर्माण करत मोठी तोडफोड केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बालाजी चाटे आणि त्याच्या तीन साथीदारांनी टोल भरण्याच्या कारणावरून टोल नाक्याच्या दोन बूथच्या काचा फोडून सुमारे २ लाख रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. यावेळी टोल कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री १:२० च्या सुमारास एका काळ्या रंगाच्या टाटा हॅरियर गाडीतून आलेल्या या आरोपींनी टोल प्लाझावर धुमाकूळ घातला.
टोल मॅनेजर दीपक बबन शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास एम.एच. ४४ सी.डी. ०३३० या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या टाटा हॅरियर गाडीतून आरोपी घटनास्थळी आले. टोल नाक्यावर दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आरोपींनी हॉकी स्टिक, लोखंडी रॉड आणि लाकडी स्टंपच्या सहाय्याने टोल बूथ क्रमांक १ आणि २ मधील काचा आणि संगणक यंत्रणेची तोडफोड केली. यावेळी कर्तव्यावर असलेले टोल कलेक्टर विठ्ठल राठोड यांना आरोपींनी बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला आहे.
या राड्यादरम्यान आरोपी बालाजी चाटे याने शिफ्ट इन्चार्ज देवेंद्र चिना यांनाही विनाकारण मारहाण केली. स्वतःची ओळख सांगत त्याने “काय तक्रार करायची ती माझ्या नावाने करा, गाडीची तक्रार केली तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” असे म्हणत आरोपींनी टोल कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी वापरत असलेल्या गाडीच्या नंबर प्लेटमध्ये वारंवार फेरफार केला जात, असून एकाच गाडीला वेगवेगळ्या नंबर प्लेट वापरण्यात येत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(४), ३(५) आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ च्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. टोल नाक्यावरील या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.