Breaking

बीडमध्ये अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करून चावडीला बांधले; आरोपीला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Updated: मार्च 15, 2026

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2026 03 15 at 4.21.04 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, एका १७ वर्षीय अल्पवयीन विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता नराधम आरोपीने पीडितेला गावातील सार्वजनिक चावडीच्या खांबाला बांधून ठेवले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मुख्य आरोपी वैभव पटेकर याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या अमानवीय घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ही संतापजनक घटना ११ मार्च रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास घडली. पीडित विवाहिता आपल्या पतीसह घरात झोपलेली असताना, घराचे दार उघडे असल्याचे पाहून वैभव पटेकरने घरात प्रवेश केला. अंधाराचा फायदा घेत आरोपीने पीडितेचे तोंड दाबून तिला बळजबरीने घराबाहेर उचलून नेले. गावाजवळील नदीच्या निर्जन परिसरात नेऊन त्याने पीडितेवर अत्याचार केला. क्रूरतेचा कळस म्हणजे, या कृत्यानंतर त्याने पीडितेला गावातील चौकात असलेल्या चावडीवर आणले आणि तिथे खांबाला बांधून टाकले.

सकाळी हा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तातडीने पीडितेची सुटका केली आणि पोलिसांना पाचारण केले. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपी वैभव पटेकरला बेड्या ठोकल्या. पीडिता अल्पवयीन असल्याने या प्रकरणात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुलकुमार लांडगे करत आहेत. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Categories

Recent Posts