Breaking

पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या

Updated: मार्च 14, 2026

By Vivek Sindhu

पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: पत्नीचे कथित प्रेमप्रकरण आणि सासरच्या मंडळींकडून मिळणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला वैतागून एका ४० वर्षीय रिक्षाचालकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदम महेमुद शेख असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मागील नऊ वर्षांपासून पेठ बीड भागातील मोहंमदीया कॉलनी येथे भाड्याने राहत होते. आदम हे चालक म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. मात्र, मागील तीन वर्षांपासून त्यांची पत्नी सुहाना ऊर्फ मिना ही त्यांना नीट वागणूक देत नव्हती आणि तिचे कथितरीत्या तिचे प्रेमप्रकरण सुरु होते. या कारणावरून आदम यांनी तिला वारंवार समजावून सांगितले, पण तिच्या वागण्यात बदल झाला नाही. उलट सुहाना ही तिचे भाऊ आमेर आणि सुमेर, आई मुमताज आणि चुलत सासरा समीर यांना आदम यांच्या विरुद्ध भडकावत असे. या चिथावणीमुळे सासरची ही मंडळी आदम यांना वारंवार शिवीगाळ करून मारहाण करत असत. “तू सुहानाला तलाक दे, आम्ही तिचे दुसरे लग्न लावून देतो” असे म्हणत त्यांचा मानसिक छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून १२ मार्च २०२६ रोजी आदम यांनी सुरत येथे राहणारा आपला भाऊ आवेद आणि बहीण निलोफर यांना फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तेलगाव नाका परिसरातील पापनेश्वर मंदिर परिसरात झाडाला फाशी घेतली.

या प्रकरणी आवेद महेमुद शेख यांच्या तक्रारीवरून पेठ बीड पोलिसांनी पत्नी सुहाना आदम शेख, मेव्हणा आमेर आबेद शेख, सुमेर आबेद शेख, सासू मुमताज आबेद शेख आणि चुलत सासरा समीर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे . पोलीस उपनिरीक्षक मन्सूर शहा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts