Breaking

अंबाजोगाईत शेख रहीम यांच्या इफ्तार पार्टीतून सामाजिक सलोख्याचे दर्शन; सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

Updated: मार्च 13, 2026

By Vivek Sindhu

सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: शहराचे माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम यांच्या वतीने गुरुवारी, १२ मार्च रोजी मौलाली पहाड दर्गाह परिसरात भव्य ‘दावत-ए-इफ्तार’चे आयोजन करण्यात आले होते. पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहभोजनात शहराच्या सर्वधर्मीय बांधवांनी आणि विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. या सोहळ्याने अंबाजोगाईच्या सर्वसमावेशक संस्कृतीची आणि शेख रहीम यांच्या जनमानसातील अढळ लोकप्रियतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.

गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ अंबाजोगाईच्या सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या शेख रहीम यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामाजिक सलोखा जपला आहे. विशेष म्हणजे, सध्या त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत पद नसतानाही केवळ त्यांच्या एका शब्दाखातर शहराचा हजारो लोकांचा जनसागर याठिकाणी लोटला होता. सत्तेच्या पदापेक्षाही त्यांनी कमावलेली माणसे हीच त्यांची खरी संपत्ती असल्याचे या सोहळ्याने अधोरेखित केले.

अंबाजोगाई शहराचा इतिहास पाहता, १९८० ते १९९० च्या दशकातील संवेदनशील काळात जातीय दंगली रोखण्यासाठी शेख रहीम यांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सर्व धर्मीयांना सोबत घेऊन शहराची शांततेची परंपरा जतन करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे आणि मानवतावादी भूमिकेमुळे शहरात कधीही जातीय तेढ निर्माण झाली नाही, असे मत यावेळी जाणकारांनी व्यक्त केले.

या इफ्तार सोहळ्याला नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, पन्नगेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अक्षय मुंदडा, प्रा. नानासाहेब गाठाळ, डॉ. नरेंद्र काळे, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया, पोलीस निरिक्षक शरद जोगदंड, नगरसेवक ॲड. किरण भालेकर, गणेश देशमुख, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, शिवाजीराव कुलकर्णी, ज्ञानोबा कांबळे, विलास सोनवणे, आकाश कराड, नगरसेविका रचना परदेशी, यांसारख्या विविध पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच भीमसेन लोमटे, मनोज लखेरा, माजी नगरसेवक गणेश मसने, दगडूभाई, नगरसेवक राजू मस्के, डॉ. राहुल धाकडे, डॉ. राकेश जाधव यांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेख रहीम, शेख इर्शाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे उत्साहात स्वागत व आदरातिथ्य करण्यात आले.


Categories

Recent Posts