Breaking
Updated: मार्च 13, 2026
माजलगावच्या मुकादमाविरुद्ध गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelवडवणी: मजूर आणि ऊसतोडणीची वाहने पुरवण्याचे आमिष दाखवून एका ऊसतोड मुकादमाची तब्बल २२ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना वडवणी तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी माजलगाव येथील एका पोट-मुकादमाविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामकिसन शंकर चोले, वय ५१ वर्षे, राहणार खडकी, ता. वडवणी, हे ऊसतोड मुकादमाचा व्यवसाय करतात. त्यांनी सन २०२१-२०२२ च्या हंगामासाठी कर्नाटक राज्यातील श्री बसवेश्वर शुगर्स लि. कारजोल या साखर कारखान्यासोबत मजूर व वाहने पुरवण्याचा करार केला होता. या कामासाठी कारखान्याने चोले यांच्या बँक खात्यात एकूण २२ लाख ८० हजार रुपये जमा केले होते. याच काळात सुधाकर भानुदास राठोड, राहणार रामनगर माजलगाव, याने चोले यांची भेट घेऊन आपल्याला दोन टोळ्या, ३२ मजूर आणि दोन वाहने पुरवण्याचे आश्वासन दिले.
या आश्वासनावर विश्वास ठेवून रामकिसन चोले यांनी सुधाकर राठोड याच्यासोबत नोटरी करून कारखान्याकडून मिळालेले २२ लाख ८० हजार रुपये वेळोवेळी आरटीजीएस आणि चेकद्वारे राठोड याच्या खात्यावर वर्ग केले. मात्र, पैसे घेऊनही सुधाकर राठोड याने ठरल्याप्रमाणे मजूर किंवा वाहने कारखान्याला पुरवली नाहीत. चोले यांनी वारंवार विचारणा केली असता, राठोड याने पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि उलट दमदाटी करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चोले यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या तक्रारीवरून वडवणी पोलिसांनी सुधाकर भानुदास राठोड याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पांडुरंग व्हागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक दगडू केदार हे करत आहेत.