Breaking
Updated: मार्च 14, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: तालुक्यातील तांबवा येथे जुन्या वादातून एका २५ वर्षीय तरुणावर पाच जणांनी कत्ती आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना १२ मार्च २०२६ रोजी दुपारी घडली. नरसिंग उर्फ संग्राम अभिमान चाटे असे जखमी तरुणाचे नाव असून, आरोपींनी त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याला बेदम मारहाण केली. या हल्ल्यावेळी आरोपींनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे यांच्या नावाचा उल्लेख करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध कलम १०९ अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे त्याच्या भावाच्या विधीसाठी बाहेर आला होता, त्या आधीच ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संग्राम चाटे हा आपल्या मित्रासोबत मोटारसायकलवरून तांबवा जिल्हा परिषद शाळेसमोरील मेन रोडने जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. यावेळी दया विलास चाटे, शरद परमेश्वर चाटे, अमोल ठोंबरे, सागर चाटे आणि गोट्या भालेकर यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घातला. “तुला आज जिवंत सोडत नाही, तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे – १३१३ तुला दाखवतो” असे चिथावणीखोर विधान करत आरोपी दया चाटे याने संग्रामवर कत्तीने खुनी हल्ला चढवला.
हल्ल्यादरम्यान शरद चाटे याने संग्रामच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, ज्यामुळे त्याला काहीच दिसणे शक्य झाले नाही. याच संधीचा फायदा घेत दया चाटे याने कत्तीने संग्रामच्या डोक्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले, तर इतर आरोपींनी लोखंडी रॉडने त्याच्या पाठीवर आणि मानेवर बेदम मारहाण केली. या भीषण मारहाणीत संग्राम जागीच बेशुद्ध पडला होता. जखमी तरुणावर सध्या केज येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केज पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.