Breaking

नराधमांनी महिनाभरात तीनदा विकले, चौथ्या लग्नाच्या भीतीने विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

Updated: मार्च 7, 2026

By Vivek Sindhu

आष्टी तालुक्यातील खळबळजनक घटना, चौघांवर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी तालुक्यातील खळबळजनक घटना, चौघांवर गुन्हा

आष्टी: तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली असून, एका २१ वर्षीय विवाहितेची केवळ आर्थिक लाभासाठी एकाच महिन्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी विक्री करून तिचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. या सततच्या मानवी तस्करी आणि मानसिक छळाला कंटाळून पीडितेने नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या गंभीर प्रकरणी आष्टी पोलिसांनी पुणे आणि तुळजापूर येथील चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

लातूर येथील रहिवासी असलेल्या या पीडित तरुणीचा पहिला विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता, मात्र पतीच्या वर्तणुकीमुळे ती माहेरी राहत होती. याच काळात तिची भेट हडपसर येथील महानंदा नावाच्या एजंटशी झाली. महानंदाने दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून पीडितेला पुण्याला नेले आणि तेथे ५ लाख रुपये घेऊन अमर कालभोर नावाच्या व्यक्तीशी तिचे बळजबरीने लग्न लावून दिले. अवघ्या दहा दिवसांतच तिला तिथून काढून दुसऱ्या एका व्यक्तीला साडेचार लाख रुपयांत विकण्यात आले. या नराधमांचा लग्नाचा बाजार इथेच थांबला नाही. महानंदाने तुळजापूर येथील एका महिलेच्या मदतीने ४ मार्च २०२६ रोजी आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथील एका व्यक्तीशी पीडितेचे तिसरे लग्न लावून पुन्हा साडेचार लाख रुपये लाटले.

या छळाचा कळस तेव्हा गाठला गेला जेव्हा ६ मार्च रोजी पीडितेला पुन्हा फोन करून चौथ्या लग्नासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले. वारंवार होणारी ही विक्री आणि भविष्यातील अत्याचाराच्या भीतीने पीडिता प्रचंड मानसिक दबावाखाली आली आणि तिने टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध प्राशन केले. सध्या तिच्यावर मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

आष्टी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयित महानंदा, तिचा पती आणि तुळजापूर येथील अन्य दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ आणि ६१ अन्वये मानवी तस्करी आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक शरद ज्ञानदेव भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे या आंतरजिल्हा रॅकेटचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts