Breaking
Updated: मार्च 6, 2026
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐतिहासिक अर्थसंकल्प
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐतिहासिक अर्थसंकल्प
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची निरंतरता अशा मोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. राज्याच्या या अर्थसंकल्पातून शेती, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा या चतुःसूत्रीवर भर देण्यात आला असून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा अर्थसंकल्प समर्पित करत फडणवीस यांनी भावूक सादही घातली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली असून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. केवळ कर्जमाफीच नव्हे तर जे शेतकरी कर्जाचे हप्ते नियमितपणे आणि वेळेवर भरतात त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन सरकारने प्रामाणिक कर्जदारांचाही गौरव केला आहे. याशिवाय राज्यातील सुमारे एक हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले जाणार असून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढवून त्यात आता शेतमजुरांचाही समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील महिला वर्गासाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील आर्थिक वर्षातही अखंडपणे सुरू राहणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेसाठी आवश्यक असलेली भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून विरोधकांकडून योजनेच्या भविष्याबाबत केल्या जाणाऱ्या शंकांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सध्या राज्यात असलेल्या सदतीस लाख लखपती दीदींची संख्या वाढवून आणखी पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. तसेच एकल महिलांच्या कल्याणासाठी लवकरच विशेष धोरण आणले जाणार असून महिला गोपालक आणि शेळीपालकांसाठी स्वतंत्र उपक्रम राबवले जाणार आहेत.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सरकारने ‘महाविस्तार एआय’ या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची घोषणा केली असून याद्वारे तीस लाख शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि हवामानाची अचूक माहिती दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत त्यांच्यासाठी ‘वसुधा’ नावाची विशेष मेसेज सेवा सुरू केली जाणार आहे. राज्याची एकूण महसुली तूट एक टक्क्यापर्यंत मर्यादित ठेवण्यात यश आले असून सात लाख एकोणसत्तर हजार कोटींहून अधिक रुपयांच्या तरतुदी असलेला हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे केवळ आश्वासनांचे गाजर असल्याची टीका केली आहे.