Breaking

माजलगावच्या सोनार लुटणाऱ्या टोळीवर ‘मिनी मोक्का’

Updated: मार्च 5, 2026

By Vivek Sindhu

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची मोठी कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची मोठी कारवाई

बीड: जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या सोनाराची लूट करणाऱ्या टोळीवर ‘मिनी मोक्का’ लावून गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे. २५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या धाडसी चोरीचा तपास लावत पोलिसांनी टोळीप्रमुखासह चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. नवीन भारतीय न्याय संहितेच्या कलम १११ (संघटित गुन्हेगारी) अंतर्गत करण्यात आलेली ही जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण कारवाई ठरली आहे.

माजलगाव येथील मजरंत रोडवर राहणारे सोनार अमोल पंढरीनाथ गायके हे २५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आपल्या पुतण्यासह सोन्या-चांदीचे दागिने पिशवीत घेऊन आठवडी बाजाराला जात होते. गढी रोडवर मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि सत्तूरचा धाक दाखवून ५९ लाख ३३ हजार ५८० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले होते. या घटनेनंतर पीडित सोनाराने दिलेल्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बालक कोळी आणि सपोनि पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक बाबी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पाच आरोपींची टोळी निष्पन्न केली, ज्यापैकी चौघांना अटक करण्यात यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये टोळीप्रमुख कृष्णा तुकाराम निरडे (वय २२, रा. पावरहाऊस रोड, माजलगाव), अभिषेक अशोक शिंदे (वय २२, रा. माजलगाव), एकनाथ अरुण कपाले (वय ३५, रा. शाहूनगर, बीड) आणि संजीव ऊर्फ संजय विष्णुदास कांबळे (वय २८, रा. उदगीर, जि. लातूर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून २९ लाख २२ हजार ६०० रुपयांचे दागिने हस्तगत केले असून पाचवा फरार आरोपी अद्याप पोलिसांच्या रडारवर आहे.

पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, या टोळीप्रमुख आणि त्याच्या साथीदारांनी जिल्ह्यात संघटितपणे शस्त्रांचा धाक दाखवून आर्थिक फायद्यासाठी एकूण सात गुन्हे केले आहेत. ही संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी नवीन भारतीय न्याय संहितेनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत या टोळीवर कलम १११ (संघटित गुन्हेगारी) म्हणजेच ‘मिनी मोक्का’ लावण्याची परवानगी माजलगाव ग्रामीण पोलिसांना दिली. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, बालक कोळी, सपोनि पांडव आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळून केली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.


Categories

Recent Posts