Breaking
Updated: फेब्रुवारी 17, 2026
धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, दोन मित्र गंभीर जखमी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारदार शस्त्राने तरुणाची हत्या, दोन मित्र गंभीर जखमी
आष्टी: सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टेटस आणि स्टोरी ठेवण्याच्या किरकोळ वादातून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथे सोमवारी रात्री भीषण हाणामारी झाली. या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात होऊन एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेसमोर सोमवारी रात्री तरुणांचे दोन गट आमनेसामने आले. गेल्या काही दिवसांपासून इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर एकमेकांच्या विरोधात टाकलेल्या अपमानास्पद स्टोरीवरून दोन्ही गटात धुसफूस सुरू होती. याच कारणावरून सोमवारी रात्री दोन्ही बाजूचे तरुण भिडले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर एका गटाने रागाच्या भरात धारदार शस्त्राने दुसऱ्या गटातील तरुणांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली.
या प्राणघातक हल्ल्यात दीपक शिवाजी नालकोल (वय २०, रा. रुईनालकोल) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. दीपकसोबत असलेले अन्य दोन तरुणही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा नरवाडे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त तैनात केला असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून वेगाने केला जात आहे.