Breaking
Updated: फेब्रुवारी 3, 2026
सुनेत्रा पवार पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री म्हणून काम पाहणार; आदेश जारी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर निर्माण झालेली राजकीय आणि प्रशासकीय पोकळी भरून काढण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांच्या आग्रहाचा मान राखत सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली असून, ९ फेब्रुवारीपासून त्या आपल्या कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात करणार आहेत.
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेला नेतृत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केल्याने आता राज्याच्या सत्तेत सुनेत्रा पवार यांचा उदय झाला आहे. अजितदादांच्या निधनानंतर बारामती आणि बीडमध्ये पाळण्यात आलेल्या उत्स्फूर्त बंदमधून जनतेची त्यांच्याबद्दलची आत्मीयता दिसून आली होती, आता त्याच नात्याला न्याय देण्याचे आव्हान सुनेत्रा पवार यांच्यासमोर असेल.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांनी अत्यंत अल्प काळात प्रशासकीय शिस्त आणि विकासाचा धडाका लावला होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर दादांनी जिल्ह्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. त्यांनी सुरू केलेले विकासप्रकल्प आणि जिल्ह्याचा कायापालट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार याच योग्य उत्तराधिकारी असल्याचे मत पक्षाच्या आमदारांनी व्यक्त केले. त्यामुळे पुण्याच्या बालेकिल्ल्यासोबतच आता बीडच्या विकासाची जबाबदारीही त्यांच्याकडे आली आहे.
केवळ सरकारमध्येच नाही, तर पक्षातही सुनेत्रा पवार यांची पकड आता मजबूत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात त्यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराही सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. अर्थ खाते वगळता अजितदादांकडे असलेली इतर सर्व महत्त्वाची खाती आता सुनेत्रा पवार सांभाळणार असून, त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची ही मोठी कसोटी मानली जात आहे.
अजितदादांच्या कार्यशैलीचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार सज्ज झाल्या आहेत. येत्या ९ फेब्रुवारी रोजी त्या मंत्रालयातील आपल्या कार्यालयातून पदभार स्वीकारतील. दादांप्रमाणेच त्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून आणि प्रशासनावर पकड मिळवून लोकांचे प्रश्न मार्गी लावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्याच्या राजकारणातील या मोठ्या फेरबदलाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.