Breaking

आष्टी शहरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; भररस्त्यात चोरट्यांची मुजोरी

Updated: जानेवारी 24, 2026

By Vivek Sindhu

भररस्त्यात चोरट्यांची मुजोरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना वैदान्त कॉस्मेटिक समोर घडली आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून येत ही जबरी चोरी केली असून, या घटनेमुळे महिला वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

सावतानगर गल्ली परिसरात राहणाऱ्या मंजुश्री अतुल धोंडे या २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी आपल्या नणंदेसह स्कुटी क्रमांक एमएच २३ बीजे २३२७ वरून जात होत्या. पोस्ट ऑफिस समोरून भाजीपाला घेऊन घराकडे परतत असताना, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वैदान्त कॉस्मेटिक समोर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जोरात ओढले. यावेळी झालेल्या ओढाओढीत मंगळसूत्राचा सात ग्रॅम वजनाचा आणि सुमारे तीन इंच लांबीचा तुकडा चोरट्यांच्या हाती लागला. मंगळसूत्र तोडल्यानंतर दोन्ही चोरटे तातडीने पसार झाले.

या प्रकरणी मंजुश्री धोंडे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरीला गेलेल्या सोन्याच्या तुकड्याची किंमत अंदाजे ३५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार तांदळे करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले जात आहे.


Categories

Recent Posts