Breaking
Updated: जानेवारी 21, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील भोसे येथे एका ऊसतोड मजुराचे पाय बांधून दगडाने डोके ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. मच्छिंद्र अंबादास भोसले (वय ४२, रा. उखळवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे मृत मजुराचे नाव असून या प्रकरणी अजय राजेंद्र माने (रा. भोसे, ता. कोरेगाव) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनानंतर आरोपीने स्वतःही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
मच्छिंद्र भोसले हे गेल्या तीन-चार वर्षांपासून जरंडेश्वर शुगर मिलसाठी ऊसतोडणीचे काम करत होते. १५ जानेवारी रोजी रात्री आरोपी अजय माने याने मच्छिंद्र यांना हॉटेलमध्ये जेवायला नेतो असे सांगून आपल्या शेतात नेले. तिथे त्यांचे पाय बांधून दगडाने डोके ठेचून त्यांची हत्या केली आणि मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला. पती घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने १७ जानेवारीला कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मंगळवारी सकाळी आरोपीच्या वडिलांना शेतात मृतदेह आढळल्यानंतर या भीषण गुन्ह्याचा उलगडा झाला.
या घटनेची माहिती मिळताच बीड जिल्ह्यातील मजूर आणि नेत्यांनी जरंडेश्वर कारखाना परिसरात धाव घेऊन ठिय्या आंदोलन केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कारखाना परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करत आहेत. आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.