Breaking
Updated: जानेवारी 12, 2026
आठवडी बाजारात चोऱ्या वाढल्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelसाळेगाव आणि केजच्या आठवडी बाजारात दोन चोऱ्या
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील आठवडे बाजारात चोऱ्यांचे सत्र वाढले असून साळेगाव येथील आठवडी बाजारातून एकाची मोटार सायकल तर केजच्या आठवडी बाजारात कांदे विक्री करीत असलेल्या महिलेची वीस हजार रु आणि दागिने असलेली पैशाची पिशवी चोरीला गेली आहे.
दि. ८ जानेवारी रोजी केज तालुक्यातील कानडी माळी येथील अनंत अच्युत कटारे हे शेतकरी साळेगाव येथे गुरवारी भरत असलेल्या जनावरांच्या बाजारात व्यापाऱ्याला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्र.(एम एच-२३/ए व्ही-८७९०) ही आठवडी बाजारातील शेळ्यांच्या बाजारात हॅण्डल लॉक लावून उभी करून ते व्यापाऱ्याला भेटण्यासाठी गेले. थोड्या वेळाने त्यांनी येऊन पहिले असता त्यांची मोटार सायकल ही कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
तसेच दुसऱ्या एका घटनेत नागझरी येथील सुरेखा संदिपान चौरे या दि. ९ जानेवारी रोजी केज येथील शुक्रवारच्या आठवडी बाजारात शेतातील कांदे विक्री करण्यासाठी आल्या होत्या. बाजारात कांदे विक्री करीत असताना त्यांनी पैशाची पिशवी त्यांच्या मांडीवर ठेवली होती. त्या पिशवीत २० हजार रु. व गळ्यातील २.५ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र ठेवलेले होते. त्या गिऱ्हाईकला कांदे विक्री करीत असताना चोरट्यांनी नजर चुकवून त्यांची पैसे व ऐवजासह पिशवी चोरून नेली.
या दोन्ही चोरीची केज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल मुरकुटे आणि पोलिस नाईक नागरगोजे हे दोन वेगवेगळ्या चोरीचा तपास करीत आहेत.
आठवडी बाजारात सुद्धा गर्दीच्या ठिकाणी हवे सीसीटीव्ही कॅमेरे :-
गर्दीचा फायदा घेऊन चोरटे आठवडी बाजारात चोऱ्या करीत आहेत. म्हणून स्थानिक प्रशासनाने गर्दीच्या आणि चोरी होत असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास अशा चोऱ्या कमी होतील.