Breaking
Updated: डिसेंबर 25, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमहामार्ग अंबाजोगाई मार्गेच न्यावा; आमदार नमिता मुंदडा यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
बीड: राज्यातील महत्त्वाकांक्षी लातूर-कल्याण ‘जनकल्याण द्रुतगती महामार्ग’ हा बीड जिल्ह्याच्या विकासाचा कणा ठरणारा असून, राजकीय दबावापोटी या मार्गाची दिशा बदलण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, अशी जनभावना आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कळविली आहे. मूळ प्रस्तावाप्रमाणे हा मार्ग लातूर-अंबाजोगाई-केज-बीड-जामखेड-अहिल्यानगरमार्गे कल्याण असाच राबवण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. बीड जिल्हा आधीच दुष्काळ, बेरोजगारी आणि स्थलांतराच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत हा महामार्ग जिल्ह्यासाठी संजीवनी ठरणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचे १० ते १२ तासांचे अंतर ५ ते ७ तासांवर येणार असून इंधन आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. शेतकऱ्यांचा माल मुंबई-पुण्यासारख्या बाजारपेठेत जलद पोहोचणे शक्य होणार असून, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.
परंतु, गेल्या काही दिवसांपासून हा महामार्ग धाराशिव जिल्ह्याकडे वळवण्यासाठी काही लोकप्रतिनिधींकडून राजकीय दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर येत आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि बीड जिल्ह्यावर अन्याय करणारी आहे. बीड जिल्ह्याला जाणूनबुजून विकासापासून वंचित ठेवले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत असून, यातून मोठा असंतोष पसरत आहे. नियोजित मार्गात बदल करणे जिल्ह्याच्या भविष्याशी खेळण्यासारखे आहे, असे मत आमदार मुंदडा यांनी पत्रात व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, युवक आणि सामाजिक संघटना आता या अन्यायाविरुद्ध एकत्र येत आहेत. जर सरकारने वेळीच सकारात्मक निर्णय घेऊन बीड जिल्ह्याचा हक्क अबाधित ठेवला नाही, तर जनतेकडून लोकशाही मार्गाने रस्ता रोको आणि जनसंघर्ष छेडला जाईल. महाराष्ट्राच्या संतुलित विकासात कोणत्याही जिल्ह्यावर अन्याय होऊ नये, हीच अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे असे आ. नमिता मुंदडा यांनी नमूद केले आहे.