Breaking

अल्पसंख्यांक अधिकार दिन समतावादी आणि न्याय्य समाजनिर्मितीसाठी महत्त्वाचा – राजकिशोर मोदी

Updated: डिसेंबर 18, 2025

By Vivek Sindhu

राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाकडून जागतिक अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाकडून जागतिक अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
शहरातील राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाकडून जागतिक अल्पसंख्यांक हक्क दिवस गुरूवारी साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना अल्पसंख्यांक अधिकार दिन हा केवळ एका समुदायापुरता मर्यादित नसून, समतावादी आणि न्याय्य समाजनिर्मितीसाठी सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस आहे असे प्रतिपादन पापा मोदी यांनी केले. तर राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी अल्पसंख्यांक अधिकार दिन साजरा केला पाहिजे असे आवाहन माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केले.

शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या जोधाप्रसादजी मोदी सभागृहात राजकिशोर (पापा) मोदी मित्र मंडळाकडून जागतिक अल्पसंख्यांक हक्क दिवस गुरूवार, दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी तर व्यासपीठावर माजी आमदार पृथ्वीराज साठे, रिपाइं आठवले गटाचे नेते महेंद्र निकाळजे, ऍड.इस्माईल गवळी, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ राजेश इंगोले, मुजम्मील खतीब सर, हाजी खालेक कुरेशी, गफ्फार भाई, इर्शाद सर, हिफाजत भाई आणि शहेबाज म.फारूख मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जागतिक अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा देवून मान्यवरांचे मित्र मंडळाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, दरवर्षी १८ डिसेंबर रोजी साजरा होणारा हा दिवस अल्पसंख्यांक समुदायांना भेडसावणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अडचणींवर प्रकाश टाकतो. तसेच विविध समुदायांमध्ये परस्पर समज, सहकार्य आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचे काम करतो. हा दिवस समान अधिकार, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांची आठवण करून देतो. याचबरोबर, अल्पसंख्यांकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्याची आणि ज्या क्षेत्रांमध्ये अधिक काम करण्याची गरज आहे, ती ओळखण्याची संधीही देतो. असे असताना ही भाजपा सरकारच्या काळात हा दिवस साजरा केला जात नाही. हे योग्य नाही. परंतु, देशात व राज्यात जेंव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना दरवर्षी १८ डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक दिवस नियमितपणे साजरा केला जात होता. मुस्लिम समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा दिवस साजरा केला पाहिजे, मुस्लिम समाजात शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगती झाली पाहिजे, मुस्लिम समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पुढे गेले पाहिजे, आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार हे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतात. विविध विकिस योजना राबवितात. मुस्लिम समाजाने सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असताना आम्हांला नेहमीच पाठबळ दिले. आमच्यावर विश्वास दाखवला. आणि आशिर्वाद दिला म्हणून आगामी काळात दादांच्या नेतृत्वाखाली व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवरांना सोबत घेऊन अंबाजोगाई शहरात मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, मुस्लिम तरूणांना शिक्षण, उद्योग, व्यवसाय, रोजगार यांच्या संधी उपलब्ध करून योग्य दिशा देण्यासाठी आपण काम करणार असल्याचे पापा मोदी यांनी सांगितले. तर माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी भारतात दरवर्षी १८ डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्यांक हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच हा दिवस केवळ हक्कांची आठवण करून देणारा नसून, देशाच्या विकासात या समुदायांनी दिलेल्या योगदानाचा आदर करण्याचाही आहे. विविध सरकारी योजना आणि शिष्यवृत्तींमार्फत या समुदायातील तरूणांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी आजच्या दिवशी जनजागृती केली जाते असे सांगितले. समाजाचे आपण काही देणे लागतो या विधायक भूमिकेतून आगामी काळात पापा मोदींच्या माध्यमातून अंबाजोगाई नगरपरिषद अल्पसंख्यांक समाजासाठी बीड शहराच्या धर्तीवर एखादा प्रकल्प सुरू करेल. एक व्यासपीठ निर्माण करेल. अशी ग्वाही माजी आमदार साठे यांनी उपस्थितांना दिली. याप्रसंगी मुजम्मील खतीब सर यांनी समाजाच्या विविध क्षेत्रात मुस्लिम समुदायाचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे असे सांगितले. तर महेंद्र निकाळजे यांनी अंबाजोगाईत सर्वधर्मिय समाज बांधवांसाठी कार्य करणारे पापा मोदी यांनी मुस्लिम समाजाच्या विकासासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे असे सांगितले. व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कृतीचा निषेध व्यक्त केला. ऍड.इस्माईल गवळी यांनी ‘अल्पसंख्यांक हक्क दिन महत्त्व आणि इतिहास’ याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, भारतात राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस हा दरवर्षी १८ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय किंवा जातीय, धार्मिक आणि भाषा ही अल्पसंख्याकांशी संबंधित व्यक्तींच्या अधिकारांवरील घोषणापत्र स्वीकारले होते, त्याची आठवण करून देतो. भारतात राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग हा दिवस आयोजित करतो असे सांगितले. तर इर्शाद सर यांनी अल्पसंख्यांक समुदायांना (मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन) भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधणे. त्यांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करणे. समाजात धार्मिक सौहार्द आणि विविधतेत एकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींना मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रोत्साहन देणे हा अल्पसंख्यांक दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे असे सांगितले. डॉ.राजेश इंगोले यांनी सामाजिक कार्यकर्ते स्व.हाफिजभाई सिद्दीकी यांची आठवण काढली. शेरोशायरी केली. अल्पसंख्यांक कोणाला म्हणावे, राष्ट्रीय विकासात आपली कर्तव्ये याबाबत माहिती दिली. हाजी खालेक कुरेशी यांनी अल्पसंख्यांक दिवस साजरा करायची का आवश्यकता पडली याबाबत परखड भाष्य केले. तर गफार भाई यांनी पापा मोदी हे अल्पसंख्याकांसाठी काम करणारे, व त्यांच्या योगदानाचा सन्मान करणारे, त्यांना विविध संधी उपलब्ध करून देणारे आणि अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी आर्थिक संस्था स्थापन करणारे विकासप्रिय नेतृत्व आहे. यापुढे ही त्यांच्या पाठीशी मुस्लिम समुदायाने भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार शहेबाज म.फारूख मनियार यांनी मानले. यावेळी सभागृहात माजी नगरसेवक खालेदभाई चाऊस, शेख मुख्तार (चाचू), शेख मोईनभाई, रौफभाई बिल्डर, सय्यद रशीदभाई, जावेद इस्माईल गवळी, शेख जफरभाई, अकबर पठाण, तानबा लांडगे यांच्यासह मुस्लिम समाजासह सर्वधर्मीय समाज बांधव, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी आणि युवक उपस्थित होते.


Categories

Recent Posts