Breaking

अबब! धुमेगाव शिवारातून तब्बल १ कोटी ३७ लाखांचा गांजा जप्त; एक अटकेत, एक फरार

Updated: नोव्हेंबर 2, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 11 02 at 12.49.24 336d41d2 scaled

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई : जिल्ह्यातील शेतजमिनींच्या आडोशाखाली अंमली पदार्थांचा काळा धंदा फोफावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गेवराई तालुक्यातील मौजे धुमेगाव शिवारातील पिराचे शेत नावाच्या शेतात कापसाच्या पिकामध्ये लपवून ठेवलेली तब्बल ४९०.७० किलो गांजाची झाडे बीड एलसीबीच्या पोलिसांनी शोधून काढली. या गांजाच्या झाडांची किंमत १,३७,३९,६०० रुपये आहे. आरोपी नारायण शेषेराव मगर याला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे.

धुमेगावमध्ये गांजाची लागवड सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे १ नोव्हेंबर रोजी आली होती. त्यानुसार बीड गुन्हे शाखा व चकलांबा पोलीस पथकाने शेतावर छापा टाकला. कापसाच्या शेतात अंतर ठेवून गांजाची रोपे वाढवून त्यांची काळजीपूर्वक जपणूक केली जात असल्याचे दिसून आले. चौकशीत नारायण शेषेराव मगर, वय ४४, रा. धुमेगाव याने लागवडीची कबुली दिली. 

पोलिसांनी आजूबाजूला शोध घेतला असता शेजारील शेतही ‘हिरवे’ निघाले. सुरेश सर्जेराव मगर यांच्या जमिनीतही मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडे आढळली. पंचनामा करण्यात आला असता नारायण मगर यांच्या गट क्र. १९० मध्ये ४४ झाडे वजन १५३.१५ किलो किंमत ४२ लाख ८८ हजार २०० रुपये आणि सुरेश मगर यांच्या शेतात १३१ झाडे वजन ३३७.५५ किलो किंमत ९४ लाख ५१ हजार ४०० रुपये असा एकूण ४९०.७० किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

नारायण शेषेराव मगर यास ताब्यात घेण्यात आले आहे. सुरेश सर्जेराव मगर फरार असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास चकलांबा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या पथकाने केली. महसूल विभागानेही सहकार्य केले.

बीड पोलिसांनी NDPS विशेष सेल स्थापन केला असून अंमली पदार्थांची माहिती देण्यासाठी ९२७०२४३२०० हा क्रमांक जारी केला आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्याची हमी पोलिसांनी दिली आहे.


Categories

Recent Posts