Breaking
Updated: ऑक्टोबर 30, 2025
बनावट लेटरपॅड तयार करून महसुल प्रशासनाची आणि साखर कारखान्याची फसवणूक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी : धामणगाव येथील किरण अशोक नरवडे आणि त्यांचे वडील अशोक जबाजी नरवडे या दोघांविरुद्ध बनावट लेटरपॅड तयार करून महसुल प्रशासनाची तसेच श्री. गजानन महाराज शुगर लि. या साखर कारखान्याची फसवणूक केल्याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपरखेडचे ग्राम महसूल अधिकारी अशोक यशवंत सुरवसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी किरण नरवडे यांनी सन २०२३ मध्ये गजानन महाराज शुगर लि. कारखान्याशी ऊस वाहतूक करार करून चार लाख रुपये अॅडव्हान्स घेतले होते. या करारानुसार त्यांच्या वडिलांच्या गट क्रमांक ६४, ६५, ६६/३ या जमिनीवर कारखान्याचा बोजा दाखल करण्यात आला होता.
यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपी किरण नरवडे यांनी ग्राम विकास कार्यालयात येऊन “युटेक शुगर लि.” या कारखान्याचे नाव वापरून बनावट लेटरपॅड सादर केले. या पत्रात गजानन महाराज शुगर लि. कारखान्याच्या नावाने दाखल केलेला बोजा कमी करण्याची विनंती होती. पत्रातील फोन क्रमांकावर संपर्क साधल्यावरही आरोपींनी कारखान्याचे अधिकारी असल्याचे भासवून महसुल अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. त्यानंतर बोजा कमी करण्यात आला.
मात्र नंतर गजानन महाराज शुगर लि. कारखान्याने संबंधित पत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले आणि आरोपींनी कोणतीही रक्कम परतफेड केलेली नसल्याचे सांगितले. यानंतर पुन्हा जमीन बोजाखाली आणण्यात आली.
या प्रकरणी किरण अशोक नरवडे आणि अशोक जबाजी नरवडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रेडपोउपनि सातव हे करीत आहेत.