Breaking

अंबाजोगाईतील शिक्षिकेच्या बहुआयामी कार्याची नेपाळमध्ये दखल

Updated: मे 8, 2026

By Vivek Sindhu

डॉ. बी. आय. खडकभावी यांच्या प्राचार्य पदावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे शिक्कामोर्तब

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या शहरांमधील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्री योगेश्वरी नूतन विद्यालयातील सहशिक्षिका सौ.तिलोत्तमा पतकराव (इंगोले) यांना नेपाळच्या राष्ट्रीय अविष्कार केंद्राचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार श्री.महावीर पून यांचे भेटीचे निमंत्रण मिळाले आहे.
— प्लास्टिक पुनर्वापर, विद्यार्थी कृतिशीलता उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय शोध प्रबंधाची एकत्रित दखल या भेटीतून घेण्यात येणार आहे.
नेपाळच्या राष्ट्रीय अविष्कार केंद्राचे संस्थापक अध्यक्ष, ख्यातनाम शास्त्रज्ञ-संशोधक, आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॅमन मॅगसेस पुरस्काराने सन्मानित तथा नेपाळच्या म्यागदी-१ मतदारसंघाचे सद्यस्थितीतील खासदार सन्माननीय श्री.महावीर पून यांनी सौ.पतकराव यांना दिनांक ११ मे रोजी नेपाळ भेटीचे, राष्ट्रीय अविष्कार केंद्राच्या प्रत्यक्ष भेटीचे तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रभेटीचे औपचारिक निमंत्रण दिले आहे.
श्री.महावीर पून हे नेपाळमधील दुर्गम हिमालयीन खेडेगावांत वायरलेस इंटरनेट तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या कार्यासाठी जगभर सुपरिचित असून, २००७ साली त्यांना रॅमन मॅगसेस पुरस्काराने गौरविण्यात आले. सौ. पतकराव यांनी आपल्या विद्यालयात राबविलेला प्लास्टिक पुनर्वापर व विद्यार्थी कृतिशीलता हा अभिनव उपक्रम, जो राष्ट्रीय अविष्कार केंद्राच्या ग्रीन इनोव्हेशन उपक्रमाशी थेट मेळ खाणारा आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागातून पर्यावरणपूरक विचार व कृती यांची सांगड घालण्याचे हे कार्य, शाळास्तरीय नवनिर्मिती उपक्रमांमध्ये विशेष रुची असलेल्या श्री पून यांनी दखलपात्र मानले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सौ. पतकराव या सध्या नेपाळच्या कीर्तीपूर येथील सरकारी शाळा आणि अंबाजोगाई येथील सरकारी शाळा यांच्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासाचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर शोध प्रबंध लिहित आहेत. या भेटीमुळे त्यांना कीर्तीपूर परिसरात प्रत्यक्ष क्षेत्रीय संशोधन करण्याची, तेथील शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची आणि शोध प्रबंधाला एक भक्कम आंतरराष्ट्रीय आधार देण्याची बहुमोल संधी उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अविष्कार केंद्र हे संशोधन व विकास संस्कृती रुजविण्यासाठी तसेच सामाजिक-आर्थिक विकासासाठी नवकल्पनाधारित परिसंस्था निर्माण करण्याच्या ध्येयाने कार्यरत असल्याने या भेटीतून शैक्षणिक संशोधन व पर्यावरणीय नवकल्पना या दोन्ही आघाड्यांवर सहकार्याची नवी दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील अंबाजोगाई, जि. बीड येथील एका माध्यमिक विद्यालयातील शिक्षिकेच्या कार्याची व संशोधनशील वृत्तीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणे ही संस्थेसाठी, अंबाजोगाईसाठी आणि संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या भेटीतून भारत-नेपाळ शैक्षणिक सहकार्याला नव्या उंचीवर नेण्याची संधी साधली जाईल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.


Categories

Recent Posts