Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाई नगराध्यक्षपदासाठी मुंदडा-मोदींमध्ये ‘काट्याची टक्कर’; निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

Updated: डिसेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

Picsart 25 12 20 22 18 35 630 scaled

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; निवडणूक निर्णय अधिकारी दिपक वजाळे यांची माहिती

अंबाजोगाई : नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी उद्या, २१ डिसेंबर रोजी पार पडणार असून नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार, याबाबत शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा आणि लोकविकास महाआघाडीचे उमेदवार राजकिशोर मोदी यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत झाल्याने निकालाबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

शासकीय अध्यापक महाविद्यालयात ही मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार असून दुपारी ११ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
यावेळची निवडणूक वैयक्तिक प्रतिष्ठा आणि शहराच्या वर्चस्वावरून अत्यंत अटीतटीची झाली आहे. नंदकिशोर मुंदडा आणि राजकिशोर मोदी या दोन्ही दिग्गज नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे, याचा फैसला उद्या होणार आहे. या दोन बड्या नेत्यांमधील लढतीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष अंबाजोगाईच्या निकालाकडे लागले आहे. दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्ष निकालात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

सहा फेऱ्यात लागणार संपूर्ण निकाल

प्रशासकीय पातळीवर मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिपक वजाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ टेबलवर एकूण सहा फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये प्रभाग क्रमांक २, ५, ६, ८, ९, ११, १३ आणि १४ चे निकाल जाहीर होतील. पाचव्या फेरीनंतर प्रभाग १, ३, ४, ७, १५ आणि सहाव्या फेरीला प्रभाग १० व १२ ची मतमोजणी पूर्ण होणार आहे. उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना सकाळी ८.३० वाजता परिसरात तर ९.३० वाजता मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून केवळ अधिकृत प्रतिनिधींनाच कक्षात प्रवेश असेल. पत्रकार आणि इतर प्रतिनिधींसाठी बाहेरच्या कक्षात मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानानंतर निकालासाठी लागलेला प्रदीर्घ कालावधी आणि दोन मोठ्या नेत्यांमधील थेट संघर्ष यामुळे संपूर्ण शहरात सध्या निकालाचीच चर्चा सुरू आहे. साधारण एक तासात सर्व निकाल हाती येतील आणि अंबाजोगाईचा नवा नगराध्यक्ष कोण, याचे चित्र स्पष्ट होईल.


Categories

Recent Posts