Breaking
पती-पत्नीसह चार जण ठार
माजलगाव – मेहकर पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव- माजलगाव रस्त्यावर रविवार (दि.१) रोजी रात्री ११.०० वाजताच्या सुमारास टेम्पो आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीसह चार जण ठार झाले. तर, काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर माजलगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.अधिक माहितीनुसार, रविवारी साडे अकराच्या सुमारास माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील काही रहिवासी रिक्षाने (एम एच.२३ एन ०२७३) तेलगावकडून माजलगावकडे जात होते.
त्यावेळी नित्रुड जवळील एका पेट्रोल पंपासमोर समोरून येणाऱ्या एका आयशर टेम्पोने (एम.एच.२३ एम. ९२५५) त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धड़क इतकी भीषण होती की, रिक्षा जवळपास ५० ते ६० फूट दूर गेली.
अपघातात चार जणांचा मृत्यु
या अपघातात फारूक चाँद सय्यद, त्याची पत्नी सय्यद शबाना फारूक, शेख नोहिद एजाज यांच्यासह अन्य एका व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. तर, काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.
जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. या अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश साळुंखे, खत्रील मोमीन, सचिन गायकवाड, कानदास बनसोडे, चामनर आदि तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Last Updated: June 2, 2025
Share This Post